‘वॉटर रन’ने दिला पाणीबचतीचा संदेश
By admin | Published: March 20, 2017 01:10 AM2017-03-20T01:10:14+5:302017-03-20T01:10:45+5:30
जलसंपदा विभाग : जलयुक्त शिवार योजना फायदेशीर ठरल्याचे सीमा हिरे यांचे प्रतिपादन
नाशिक : जलजागृती सप्ताहांतर्गत जलसंपदा विभागातर्फे रविवारी (दि. १९) आयोजित करण्यात आलेल्या वॉटर रन उपक्रमातून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते त्र्यंबकरोड येथील सिंचन भवन येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
वॉटर रन उपक्रमातून जलबचतीचा संदेश पोहचविण्याचे आवाहन करताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, तो शिवारातच जिरविण्यासाठी शासनाची जलयुक्त शिवार योजना फायदेशीर ठरल्याचेही हिरे यांनी यावेळी सांगितले. मुख्य अभियंता सुभाष वाघमारे यांनी, घरगुती पाणी वापरात काटकसर केल्यास शेती आणि उद्योगाला अधिक पाणी देणे शक्य होईल आणि यामुळे विकासाची गती वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी स्वत:पासून जलबचतीची सुरुवात करायला हवी हे सांगताना पाण्याचे प्रदूषण आणि अतिवापर रोखण्याचे आवाहन केले.
जलसंपदा विभागाच्या इंजिनिअर्स जिमखाना येथून सुरुवात झालेल्या वॉटर रनचा एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक मार्गे पुन्हा सिंचन भवन येथे या वॉटर रनचा समारोप करण्यात आला.
यावेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवृत्त सचिव प्रकाश भामरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब काथेपुरी, गिरीश संघानी, प्रवीण गायकवाड, नाशिक सायलिस्टच्या मनीषा जगताप आणि रोटरीच्या डॉ. मनीषा खंदळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)