शहरावर पाणीकपातीचे संकट
By admin | Published: September 7, 2015 12:18 AM2015-09-07T00:18:11+5:302015-09-07T00:19:03+5:30
पावसाची अवकृपा : गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा
नाशिक : मान्सून आता परतीच्या वाटेवर असताना अद्यापही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात अवघा ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सप्टेंबर महिन्यात पावसाची अवकृपा झाल्यास नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीच्या संबंधी चाचपणी सुरू असून, आणखी पंधरा दिवस पाऊस न पडल्यास पाणीकपात अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत पूर्वा नक्षत्रात थोड्या फार पर्जन्यवृष्टीचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविलेला असल्याने नाशिककरांना अजूनही मोठ्या पावसाची आस लागून आहे.
नाशिक शहराला गंगापूर धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. दि. ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ३७८० दलघफू (६७ टक्के), तर काश्यपी धरणात ८२८ दलघफू (४५ टक्के) आणि गौतमी-गोदावरी धरणात ७९५ दलघफू (४२) टक्के इतका पाणीसाठा आहे. गंगापूर धरणसमूहात एकूण ५४०३ दलघफू (५८ टक्के) पाणीसाठा असून, दारणा धरणात ३६७६ दलघफू (५१) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ९५ टक्के, तर धरण समुहात ८३ टक्के इतका पाणीसाठा होता, तर दारणा धरणात ९८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात आता घट होऊ लागली असून, त्यातच सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने गोदावरीला अधून मधून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. दोन वर्षांपूर्वी अॅड. यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या काळात सुरुवातीला पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते. त्यावेळी महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होता. या निर्णयाला नाशिककरांनी साथही दिली होती. नंतर पाऊस भरभरून बरसल्याने पाणीकपात मागे घेण्यात आली होती.
विशेष म्हणजे शहराला हिवाळा आणि पावसाळ्यात एक वेळ पाणीपुरवठा करण्यासंदर्भातही नागरिकांकडून सूचना आल्या होत्या. यंदा जून-जुलैमध्ये पाऊस कोसळल्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाने ओढ दिलेली आहे. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली असून, सप्टेंबरअखेर समाधानकारक पाऊस न पडल्यास शहरात पाणीकपात अपरिहार्य मानली जात आहे.
महापालिका प्रशासन पाणीकपातीबाबत चाचपणी करत असून, गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० ते ८५ टक्क्यांवर जाऊन न पोहोचल्यास उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्चपासूनच टंचाईच्या झळा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)