एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 11:55 PM2016-02-02T23:55:27+5:302016-02-02T23:58:22+5:30

तिढा कायम : आज निर्णय होण्याची शक्यता

Water crisis in the city even after one-fourth of water | एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

एकलहरेचे पाणी देऊनही शहरावर पाणीकपातीचे संकट

Next

नाशिक : नाशिककरांवर आणखी पाणीकपात न लादता एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित ३०० दलघफू पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाण्याचे संकेत मिळत असले तरी या वाढीव पाण्यानंतरही शहरावर पाणीकपातीचे संकट कायम राहणार असल्याची गणिते मांडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्नी कायम असलेला हा तिढा बुधवारी (दि.३) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरात वाढीव पाणीकपात करायची की नाही, या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता आणखी पाणीकपातीचा आग्रह सत्ताधारी आघाडीने धरला आहे, तर भाजपाने पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीकपातीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाकडून महापालिकेसाठी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून ३०० दलघफू पाणी देण्याचा निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळाले असून, आमदार देवयानी फरांदे यांनीही त्यास दुजोरा दिलेला आहे. मात्र, एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला नाशिककरांची ३१ जुलैपर्यंत तहान भागविण्यासाठी आणखी ३०० दलघफू पाण्याची गरज भासणार असल्याची आकडेवारी सत्ताधारी आघाडीकडून मांडली जात आहे. २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, महापालिका गंगापूर धरणातून प्रतिदिन ११.३५ दलघफू पाणी उचलत असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी गंगापूर धरण समूहात ३०६५ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता.
महापालिकेसाठी २७०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, त्यातील १२०० दलघफू पाण्याची उचल झालेली आहे. त्यामुळे मनपासाठी १५०० दलघफू पाणी शिल्लक आहे. महापालिकेला १८६ दिवसांसाठी २१११ दलघफू पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे शासनाने एकलहरे केंद्राचे ३०० दलघफू पाणी देऊनही महापालिकेला सुमारे ३०० दलघफू पाण्याची आणखी गरज भासणार आहे. म्हणजेच सुमारे २७ दिवस पाणी पुरणार नसल्याचे स्पष्ट होते. २७ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेला वाढीव पाणीकपात करणे भागच पडणार असल्याची भूमिका सत्ताधारी आघाडीकडून घेतली जात आहे. सदर पाणीकपात ३५ टक्क्यांवर न्यायची की आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवून तूट भरून काढायची, एवढाच काय तो लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सत्ताधारी आघाडीतील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Water crisis in the city even after one-fourth of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.