दत्त चौक भागात पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:09 AM2019-05-21T00:09:13+5:302019-05-21T00:09:35+5:30
येथील दत्त चौक भागासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको : येथील दत्त चौक भागासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील काही भागांत नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी खुटवडनगर भागातील मनपाचा जलकुंभ ओव्हरफ्लो होऊन यातून हजारो लिटर पाणी वाया गेले तर दुसरीकडे सिडकोतील दत्त चौक, विजयनगर या भागांत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गाने मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पिण्यापुरताही पाणी मिळत नसल्याने याबाबत पाणीपुरवठा विभागाचाच दोेष असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पाणी येत नसल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे महिलांनी तक्रार केल्यानंतर शहाणे यांनी स्वखर्चाने टॅँकरद्वारे प्रभागात पाणीपुरवठा केला. मे महिना असल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेले असताना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सिडकोतील दत्त चौक, विजयनगर, महाकाली चौक व परिसरातील पाणीपुरवठा मनपाने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय
सिडको भागात काही ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करताना दिसून येतात. सकाळच्या सुमारास फेरफटका मारला असता बहुतांशी भागातील गल्लीबोळातील रस्त्यांवर पाण्याचा सडा मारलेला असतो, तर हौद तसेच पाण्याची साधणे भरून पाणी वाया जात असतानाही नळ बंद करीत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. एकूणत मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत काही भागांत पाणीच पाणी, तर काही भागांत मात्र पाण्याची भीषण टंचाई जाणवताना दिसून येते.