हटवादी जलसंपदा, मनपाच्या गलथान कारभारामुळे नाशिककरांवर जलसंकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:05+5:302021-07-23T04:11:05+5:30
धरणांचा जिल्हा अशी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मराठवाड्याची तृष्णा भागवण्याची क्षमता असलेल्या या जिल्ह्यात नाशिक शहरालासुध्दा मुबलक पाणीपुरवठा करता ...
धरणांचा जिल्हा अशी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मराठवाड्याची तृष्णा भागवण्याची क्षमता असलेल्या या जिल्ह्यात नाशिक शहरालासुध्दा मुबलक पाणीपुरवठा करता येत नाही अशी अवस्था आहे. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दर नाशिकराेड भागाला दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणाला कश्यपी आणि गौतमी गोदावरी दोन जोडधरणांची जोड असल्याने अडचण नाही. मात्र, गंगापूर धरणातून थेट जलावाहिनी योजना राबवण्यात आली, त्यावेळी दीडशे फूट खोल जलविहीर (जॅकवेल) खोदण्यात आली. त्या ठिकाणी धरणाच्या सखल भागातील पाणी यावे यासाठी अवघ्या काही मीटर अंतराचा चर खोदण्याचे काम गेल्या पंचवीस वर्षांत पूर्ण झालेले नाही. दरवेळी धरणातील पाणी कमी होण्याची वाट बघितली जाते. त्यावेळी चर्चा होते. विशेषत: पाणी कपात करण्याची वेळ आली की त्यावर जोरदार चर्चा सुरू होते. परंतु नंतर पाऊस सुरू झाला की, ज्यावेळी पावसाळा ओढ देईल आणि पाणी कपातीची वेळ येईल त्याचवेळी याबाबत चर्चा होते.
दारणा धरणाच्या बाबतीत जलसंपदाच्या हटवादीपणाची जोड मिळाली आहे. दारणा धरणातून रोज सुमारे चार दशलक्ष घनफूट पाणी नाशिक महापालिका चेहेडी बंधाऱ्यातून घेत असते. मात्र, देवळाली कॅम्प परिसरातील अनेक गावांचे मलमूत्र बंधाऱ्यात येत असल्याने शुध्दीकरणाला अडचणी येतात. परंतु उन्हाळ्यात दोन महिन्यांत अडचणी येत असल्याने पाणीपुरवठा होत असतो. यंदा मात्र, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अडचण आली आणि नंतर तेव्हापासून दारणा धरणातून महापालिकेचे आरक्षण असताना पाणी उचलणे बंद करण्यात आले. महापालिकेची मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना गेल्यावर्षी कायान्वित झाल्याने दारणा समूहातील धरण म्हणून दारणाचे आरक्षण मुकणे धरणातून द्यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली. मात्र, त्यांनी त्याची दखलही घेतली नाही.
त्यामुळे दारणा धरणात पुरेसे आरक्षण असतानाही नाशिकरोड भागाला गंगापूर धरणातून पाणी द्यावे लागले, त्यामुळे तेथील आरक्षण लवकर संपुष्टात आले. आणि नाशिककरांना एकवेळ पाणी कपातीला सामाेरे जावे लागले आहे.
इन्फो...
मुकणे धरणात महापालिकेला ४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळाले आहे. त्यातील अवघे १३ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले. उर्वरित सर्व म्हणजे ३८३ दशलक्ष घनफूट आरक्षण शिल्लक आहे. मात्र, त्याचा वापर महापालिकेला करता येत नाही.
इन्फो..
गंगापूर धरणात चर खोदण्याचे काम करण्यास कोणाचीही इच्छा नाही त्यामुळे तहान लागल्यानंतर चर खोदण्याची चर्चा होते, परंतु त्याचा उपयोग हाेत नाही.