नाशिक शहरातील पाणी कपात टळली, शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेणार
By संजय पाठक | Published: April 5, 2023 07:29 PM2023-04-05T19:29:15+5:302023-04-05T19:34:53+5:30
नाशिक महापालिकेने शासनाच्या आदेशानंतरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरवल्याने तूर्तास पाणी कपात टळली आहे.
नाशिक- यंदा अलनिनोमुळे पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठ्याचे फेरनियोजन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज नाशिक शहराच्या पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येेणार होता. मात्र, नाशिक महापालिकेने शासनाच्या आदेशानंतरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरवल्याने तूर्तास पाणी कपात टळली आहे.
नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा होतो. यंदा अलनिनोमुळे पावसाळा लांबणार असल्याने धरणातील पाणी साठा टिकून राहावा यासाठी नाशिक महापालिकेचे प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक हेाणार होती. येत्या शनिवारपासून शहरात पाणी कपात लागु करण्याचे नियोजन देखील होते. मात्र, नियोजनाची बैठक रद्द झाली. तर दुसरीकडे पाणी पुरवठ्यासंदर्भात शासनाकडे अगोदरच आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.