जलकुंभाचा स्लॅब कोसळला
By admin | Published: June 3, 2016 11:23 PM2016-06-03T23:23:20+5:302016-06-03T23:23:50+5:30
सटाणा येथे दूषित पाणीपुरवठा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सटाणा : शहरातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या नववसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या नामपूर रोडच्या जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उघड्यावरील या जलकुंभात पक्ष्यांची विष्ठा आणि पालापाचोळा पडत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील सन्मित्र हौसिंग, मित्रनगर, शांतीनगर, श्रमिकनगर, अभिमन्यूनगर, श्रीकृष्णनगर, पारिजातनगर, तलाठी कॉलनी, ताहाराबाद रोड, कचेरी रोड या भागातील नागरी वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी १९८८-८९ मध्ये पालिका प्रशासनाने पाच लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला होता.
मात्र पालिका प्रशासनाने वेळोवेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे अचानक या जलकुंभाचा स्लॅबच टाकीत कोसळला आहे.
हा स्लॅबचा ढिगारा पूर्णपणे
टाकीतच साचला असून, रोजचा पालापाचोळा, पक्ष्यांची विष्ठा या टाकीत पडत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेला सर्वाधिक महसूल गोळा करून देणाऱ्या नागरी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)