दारणा धरणातील पाणी उपसा बंद

By admin | Published: June 1, 2016 11:11 PM2016-06-01T23:11:22+5:302016-06-02T00:14:05+5:30

अत्यल्प पाणीसाठा : आता सारी भिस्त गंगापूर धरणावर; मे महिना पार झाल्याने सुटकेचा नि:श्वास

Water from Darna dam is closed | दारणा धरणातील पाणी उपसा बंद

दारणा धरणातील पाणी उपसा बंद

Next

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या दोन धरणांपैकी दारणात अवघा ३९ दलघफू पाणीसाठा उरल्याने महापालिकेने पाणी उपसा पूर्णपणे थांबविला असून, आता सारी भिस्त गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. दारणातील उचल थांबल्याने नाशिकरोड भागालाही गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अडचणीचा ठरणारा संपूर्ण मे महिना पार झाल्याने महापालिकेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. महापालिकेलाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, दुर्दैवाने पाऊस लांबल्यास पाणीकपातीचे फेरनियोजन करावे लागणार आहे.
महापालिकेसाठी गंगापूर धरण समूह आणि दारणा या दोन्ही धरणांतील पाणी आरक्षित आहे. शासनाने यंदा गंगापूर धरणातील ३००० दलघफू तर दारणातील ५०० दलघफू पाणी महापालिकेसाठी पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित ठेवले आहे. मात्र, दारणातील केवळ ३०० दलघफू पाणीच तांत्रिकदृष्ट्या उचलणे शक्य असल्याने दोन्ही धरणांमिळून ३३०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१५ ते २९ मे २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून २४५४ दलघफू पाण्याची उचल केली, तर दारणातून १६६ दलघफू पाणीच फक्त उचलता आले. आता गंगापूर धरणातील ५४६ दलघफू, तर दारणातील १३४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १२४९ दलघफू (२२.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरण तर पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, गौतमी धरणातही अवघे ४ दलघफू पाणी शिल्लक आहे. ७१४९ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दारणा धरणात आता केवळ ३९ दलघफू म्हणजे ०.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Web Title: Water from Darna dam is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.