प्रभाग ३१ मधील पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:03 PM2018-08-18T23:03:26+5:302018-08-19T00:16:49+5:30
प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको : येथील प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच मध्यरात्री होणाºया पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता पिण्यापुरतेदेखील पाणी मिळत नसल्याने प्रभागाचा पाणीप्रश्न गंभीर बनला असून, याबाबत प्रभागाच्या नगरसेवकांनीदेखील प्रभाग सभेत लक्षवेधी सूचना मांडल्या आहेत.
सिडको प्रभाग क्रमांक ३१चा समावेश असून, या प्रभागात शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश होतो. या प्रभागातील पाथर्डीगाव, दाढेगाव, पिंपळगाव परिसर, वासननगर, कडवेनगर, अयोध्यानगर, प्रशांतनगर, आनंदनगर, कल्पतरूनगर, स्वामी समर्थनगर या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या प्रभागातील काही भागांत मध्यरात्री केव्हातरी पाणीपुरवठा होत असून, यातही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. मध्यरात्री होणाºया पाणीपुरवठ्यामुळे अनेक नागरिक आजारी पडल्याचे सांगत याबाबत प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे व पुष्पा आव्हाड यांनी प्रभाग सभेत लक्षवेधी सूचना मांडत प्रभागातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी केली. धरणात मुबलक पाणीपुरवठा असताना पाणी मिळत नाही.