सिन्नर तालुक्यात दुधापेक्षा पाणी महाग!
By Admin | Published: May 14, 2016 11:03 PM2016-05-14T23:03:16+5:302016-05-15T00:30:50+5:30
दुष्काळात तेरावा : चारा-पाणी विकत घेऊनही दुधाला भाव नसल्याने नाराजी
सिन्नर : गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत दररोजच्या जीवनात दूध व पाणी आवश्यक असते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी दूध उपयुक्त आहे. मात्र, दुधाचे जेवढे महत्त्व आहे तेवढीच ‘किंमत’ अजूनही मिळालेली नाही. लिटरभर बाटलीबंद पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात तर तेवढेच दूध केंद्रावर विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ १७ ते १९ रुपये पडतात. त्यामुळे दुधापेक्षा पाणी महाग म्हणण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
सिन्नर तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. पूर्व भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा व पाणी विकत घेऊन गोधन सांभाळावे लागत आहे. दुष्काळी परिस्थिती, चारा व पाणीटंचाई, वाढलेले तपमान, पशुखाद्यांच्या वाढलेल्या किमती यामुळे दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दुधाच्या उत्पादनाचा खर्च वाढल्याने खरे तर दुधाचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र अशा परिस्थितीत दुधाच्या भावात मोठी घसरण झााली आहे. गेल्यावर्षी खासगी दूध संकलन केंद्रावर केंद्रात दुधाला २४ ते २६ रुपये लिटर भाव मिळत होता. आता सदर भाव १८ ते २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. एकीकडे टंचाई स्थितीने उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यात दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे.
दुधाला फॅटवरून (गुणप्रत) भाव मिळतो. उत्तम गुणप्रत असलेल्या दुधाला एखाद रुपयाला जास्त भाव मिळत असला तरी, गायींना नियमित पशुखाद्य खायला देणे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न परवडण्याजोगे आहे. दूध संकलन केंद्रावर दूध जमा करण्याची स्पर्धा असली तरी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देण्यात सदर संस्था आखडता हात घेत असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
दूध दरात होत असलेल्या सातत्याच्या घसरणीमुळे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दूध दरात कोणताही बदल झाला नसल्याचे चित्र आहे.
खासगी दूध संकलन केंद्रावर शासनाचा अंकुश नसल्याने दूध दरात नेहमीच चढउतार होताना दिसतात. वाढत्या चारा व पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना महागड्या व दुभत्या गायी सांभाळने अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अशा गायींना बाजाराची वाट दाखविल्याचे चित्र आहे. सततच्या दूध दरकपातीमुळे शेतकरी अक्षरश: नागवला जात आहे. (वार्ताहर)