केळझर डाव्या कालव्याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:58 PM2020-03-12T23:58:09+5:302020-03-12T23:59:35+5:30
सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गेल्या चार दिवसांपासून गळती लागली आहे. गव्हाणेपाडा, दगडी साकोडा, डांगसौंदाणे, मोरकुरे परिसरात या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी तब्बल दोन किलोमीटर वरील कालव्याला गळती लागली आहे. यामुळे लाभक्षेत्रातील गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत गुरुवारी (दि.१२) तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता संजय पाटील यांनी गळती लागलेल्या कालव्याची पाहणी केली.
यावेळी पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार इंगळे-पाटील यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली.
अजून आठ दिवस रब्बी आवर्तनाचे पाणी कालव्यातून गेल्यास बाधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाचे उपअभियंता रौंदळ यांनी शनिवारी (दि.१४) रात्री पाणी बंद करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या असून, येत्या पावसाळ्यापूर्वी कालव्याची गळती काढण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. केळझर डाव्या कालव्याला गळती लागल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पिके बाधित झाली आहेत. येत्या दोन दिवसात तलाठी, जलसंपदा विभागाचा एक अधिकारी आणि कृषी विभागाचा एक कर्मचारी अशा तिघांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे सादर केला जाईल .
- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदारकेळझर डाव्या कालवा कालबाह्य झाल्यामुळे नादुरुस्त असून, सुमारे दीड किलोमीटरच्या कालव्याच्या लांबीला गळती लागली आहे. या कालव्याच्या दुरु स्तीसाठी निविदा काढून कामाला सुरु वात करण्यात आली आहे. या दीड किलोमीटर कालव्याला पाइप टाकण्याचे काम सुरु आहे. पाणी बंद झाल्यावर कामाला गती मिळेल.
- अभिजित रौंदळ, उपअभियंता, जलसंपदा विभाग