गावातून वाहणारे पाणी वळविले नदीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 04:02 PM2019-07-20T16:02:30+5:302019-07-20T16:02:46+5:30
भेंडाळी : जलसंधारणात तरुणांचा पुढाकार
सायखेडा : भेंडाळी परिसरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर दाखल झालेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी नदीकडे वळविण्यात युवकांनी घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय बनला आहे. भर पावसात वाया जाणारे पाणी गावकुसाला असलेल्या नदीत नाली करून काढून दिल्याने पाण्याबद्दल असलेली जागरूकता यानिमित्ताने पहायला मिळाली.
मागील वर्षी जेमतेम पाऊस पडला होता. त्यामुळे वर्षभर गावाने भयंकर दुष्काळ अनुभवला. गावातील अनेक फळबागा पाण्याअभावी तोडव्या लागल्या. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला होता. खर्च करून शेतात उभी केलेली पिके डोळ्यादेखत करपून गेली. एप्रिल-मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा भयाण दुष्काळात पाण्याच महत्व अनेकांना पटले. गावात पडणारे पावसाचे पाणी गावातील नदीला सोडून नदीत जिरवले तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि आजूबाजूच्या विहिरींना फायदा होईल याची जाणीव झाली. त्यासाठी काही तरु णांनी पुढाकार घेतला आणि अनेक दिवसांनी पाऊस पडल्यानंतर गावातील पाणी गावकुसाच्या रस्त्याने वाहून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हातात फावडे, टिकाव, पहार घेऊन नाली खोदली. काही ठिकाणी नाली कचरा आणि प्लास्टिक कागदांनी भरून गेली होती. ती साफ करण्यात आली आणि वाहून जाणारे पाणी नदीत सोडण्यात आले.