पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:31 AM2019-05-18T00:31:49+5:302019-05-18T00:32:26+5:30
कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली.
नायगाव : कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत नायगावचे सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांनी स्वत:च्या शेतातील पिकांचे पाणी बंद करून गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तीव्र टंचाईच्या काळात
सरपंच कातकाडे यांनी केलेले
काम परिसरात कौतुकाचा विषय ठरले.
यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नायगाव खोऱ्यात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात होणाºया पाणीपुरवठ्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर डोकेदुखी ठरू लागली होती. अशी टंचाईची परिस्थती असताना गावाला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे बनले होते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे ठरले; मात्र एवढ्या मोठ्या गावाला टँकरने किती व कसा पाणीपुरवठा होणार याचीही चिंता सर्वांना होती. अशा परिस्थितीत सरपंच नीलेश कातकाडे यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी देण्याची कल्पना घरातील सदस्यांसमोर मांडली. त्यास सर्वांनी पुण्याचे काम होत असल्याने सहमती दर्शविली.
गेल्या पंधरा दिवसांपासून कातकाडे यांच्या विहिरीवरून ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धिकरणामार्फत नळयोजनेला पाणी सोडले जात आहे. कधी आठ, तर कधी पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सरपंच कातकाडे यांच्या सहकार्याने सध्या दिवसाआड सुरू झाला आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात गावाप्रती दाखविलेला जिव्हाळा सर्वांनाच आपुलकीचा गारवा निर्माण करणारा ठरला आहे.
टंचाईच्या काळात पिकाऐवजी गावाला पाणी दिल्यामुळे शेतातील पिकांना विशेषत: एक एकर कोथिंबीर पिकास मोठा फटका बसला आहे.