सांगलीला जाणाऱ्या पाण्याला अखेर ‘ब्रेक’ !

By admin | Published: May 25, 2016 11:20 PM2016-05-25T23:20:32+5:302016-05-25T23:36:48+5:30

उदयनराजे-जयकुमारांचा दावा : ‘आपल्यामुळेच उरमोडीचे अधिकारी बघा.. कसे कामाला लागले !

The water that goes to Sangli, finally breaks! | सांगलीला जाणाऱ्या पाण्याला अखेर ‘ब्रेक’ !

सांगलीला जाणाऱ्या पाण्याला अखेर ‘ब्रेक’ !

Next

सातारा : ‘आजपर्यंत धरणे सातारा जिल्ह्यात आणि त्या धरणाचे पाणी सांगली, बारामती आणि भलतीकडेच जात होते. आजही जात आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावता कामा नये म्हणून उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्याला सोडलेच कसे याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उरमोडीचे पाणी सातारा, खटाव आणि माण तालुक्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही दिले जाणार नाही. यासाठी आम्ही जागरुक आहोत. दुष्काळ संपुष्टात आणण्याची भाषा करणाऱ्यांनी दुष्काळी जनेतेच्या हक्काचे पाणी सांगली जिल्ह्याला सिंचनासाठी देण्याचे धाडस केले कसे, असा प्रश्न आहे.
अधिकाऱ्यांनी कुणीतरी सांगतो म्हणून दुष्काळी जनतेच्या तोंडचा घास काढून दुसऱ्याला देण्याचे दाखवलेले असले कसब, हे निश्चितच दुतोंडी भूमिकेचे आहे.’
‘या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याला सोडलेले उरमोडी धरणाचे पाणी कुणी सोडले, कुणाच्या सांगण्यावरून सोडले, पाणी सोडण्याचे कारण काय? असा प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे. सांगली जिल्ह्याचा उरमोडीच्या पाण्यावर हक्क कधीच नव्हता; मग उरमोडीचे पाणी का सोडले, आदी प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळण्यासाठी उरमोडी व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता यांना प्रथम निलंबित करून या संपूर्ण घृणास्पद आणि दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या प्रकाराची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषी संबंधित अधिकाऱ्यांना शासन सेवेतून
बडतर्फ करावे,’ असेही आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

मंत्र्यांच्या तोंडी आदेशाला साताऱ्याचे अधिकारी बळी !
दहिवडी : ‘आम्ही उरमोडीच्या पाण्यासाठी खूप संघर्ष केला. हे पाणी आमच्या हक्काचे आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत आम्हाला याच पाण्याचा आधार आहे. यापुढे हे पाणी पळविण्याचा उद्योग सहन केला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी तर याविषयी अधिक सतर्क राहावे. मंत्र्यांच्या तोंडी आदेशाला अधिकारी बळी पडत आहेत,’ अशी भूमिका आमदार जयकुमार गोरे यांनी एका पत्रकान्वये जाहीर केली आहे.
गोरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांत सध्या टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात प्र्रशासन तोकडे पडत आहे. दुष्काळी जनतेची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. टँकरचे फिडींग पॉइंटही कोरडे पडत चालले आहेत. अशा भीषण दुष्काळी परिस्थितीत दोन्ही तालुक्यांना फक्त उरमोडी धरणातील पाण्याचाच आधार मिळणार आहे.
माण-खटाव तालुक्यांना टंचाई परिस्थितीत हे पाणी सोडण्यासाठी खरेतर वरिष्ठ पातळीवरून सूचना येणे गरजेचे आहे. वास्तवात मात्र या दोन्ही तालुक्यांना थोडा कालावधी पाणी साडून लगेच थांबविण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून उरमोडीचे पाणी सांगलीला पळविण्याचा प्रकार सुरू होता.
याबाबत उरमोडी धरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची चांगली झाडाझडती घेतली. माण-खटावमधील जनता दुष्काळाने होरपळत असताना उरमोडीचे पाणी सांगलीला सोडलेच कसे? असा
प्रश्न विचारल्यावर अधीक्षक अभियंत्यांनी मंत्र्यांचे आदेश असल्याचे सांगितले. ‘आदेश दाखवा’ असे विचारल्यावर तोंडी आदेश असल्याचे सांगितले.
आ. गोरे याविषयी माहिती देताना पुढे म्हणाले, ‘माण-खटावच्या दुष्काळाची दाहकता अधिकाऱ्यांना सांगितल्यावर तसेच आजपर्यंत पैसा आणि पाणीही सांगलीला पळविले आहे. (प्रतिनिधी)

उरमोडीच्या पाण्यावर सांगलीचा कधीच हक्क नव्हता आणि नाही. तरी सुद्धा नुकतेच सांगलीला उरमोडी व्यवस्थापनाने पाणी सोडल्याचे उघड झाले. मी आवाज उठवल्याने आज तातडीने जरी पाणी बंद केले असले तरी सांगलीला का आणि कोणत्या अधिकारात सोडले याची सखोल उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. पाणी कुणी सोडले, कुणाच्या सांगण्यावरून सोडले, पाणी सोडण्याचे कारण काय?
- उदयनराजे भोसले, खासदार


सातारा जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील नेत्यांच्या नाकावर टिच्चून नेहमी सांगलीकडे जाणारे उरमोडीचे पाणी अखेर बुधवारी थांबले. ‘उरमोडी’च्या इतिहासात असा चमत्कार प्रथमच घडला; मात्र ‘केवळ माझ्यामुळेच हे पाणी सांगली जिल्ह्यात जाण्याचे थांबले,’ असा दावा राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले अन् काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे या दोघांनी एकाचवेळी केला आहे.


माण - खटाव हे दोन तालुके दुष्काळाने होरपळत असताना उरमोडीचे पाणी सांगलीला पळविले जात असल्याचे समजताच आपण धरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आजपर्यंत पैसा आणि पाणीही सांगलीकरांनी पळविले; मात्र असले प्रकार पुन्हा चालणार नाहीत, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा मी इशारा देताच सांगलीचे पाणी तत्काळ बंद करण्यात आले.
- जयकुमार गोरे, आमदार

Web Title: The water that goes to Sangli, finally breaks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.