९० लाखांच्या उत्पन्नावर पाणी : ‘एस.टी’ची चाके फिरलीच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 08:47 PM2018-06-09T20:47:24+5:302018-06-09T20:47:24+5:30
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती.
नाशिक : शहर बससेवा व शहरातून परगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेससची चाके संपाच्या दुसºया दिवशीही थांबलेलीच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यंदा एसटीने पुकारलेला संप हा एकाही संघटनेच्या पाठिंब्याविना सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही संघटना संपाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे अघोषित संपाबाबत नेमकी चर्चा कोणासोबत करायची हा प्रशासन व सरकारपुढील मोठा प्रश्न आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या कामगारांच्या वेतनवाढीच्या निषेधार्थ बसचालक-वाहकांसह अन्य क र्मचा-यांनी अघोषित संपाचे हत्त्यार उपसले आहे. या संपामध्ये सहभागी संघटनांनी अधिकृतपणे आपला सहभाग स्पष्ट केलेला नाही किंवा संपाची जबाबदारीही घेतलेली नाही. संप हा कर्मचा-यांमधील सरकारविरुद्धचा असंतोष आणि उद्रेक असल्याचे संघटनांच्या पदाधिका-यांचे म्हणणे आहे. अचानकपणे पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दुस-या दिवशी शनिवारी (दि.९) संपाची धार तीव्र होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बसफे-या अत्यंत तुरळक होत्या. लांब पल्ल्याची बस वाहतूक संपूर्णपणे बंद राहिली. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांची शोधाशोध करावी लागली.
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. खासगी वाहतुकदारांना प्रवासी वाहतुकीचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याने थेट बसस्थानकाच्या आवारात खासकी वाहतुकदारांनी जीप, रिक्षांसह अन्य प्रवासी वाहने उभी करुन वाहतूक सुरू केल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले. एकूणच दिवसभर लाल परी रस्त्यावरुन जणू अदृश्य झाली होती. बसस्थानकांच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत होता. रिक्षाथांबे, खासगी प्रवासी वाहतूक करणा-या बसेस, जीप, टॅक्सीच्या थांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली.
सकाळ सत्रात केवळ ३५ बसेस धावल्या
जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी आगारामध्ये शहर बस वाहतूक करणा-या बसेसच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळच्या सत्रात ३५ बसेस रस्त्यावर दुपारी एक वाजेपर्यंत धावल्या; मात्र दुपारनंतर केवळ चार ते सहा बसेस रस्त्यावर येऊ शकल्या. यामध्ये नाशिकरोड, गिरणारेसाठी एक भगूरसाठी दोन बसेस धावल्या. एकूणच रात्री बारा वाजेपर्यंत आठशेपैकी केवळ तीनशे फे-या पूर्ण होऊ शकल्या.