दुतोंड्याच्या गुडघ्याला पाणी : अंबोली परिसरात जोरदार पाऊस २ हजार आठशे क्यूसेकचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:29 AM2017-10-11T01:29:01+5:302017-10-11T01:29:12+5:30
शहरात जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच होती. त्यामुळे रात्री आठ वाजता गंगापूर धरणातून दोन हजार ८०० क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला.
नाशिक : शहरात जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच होती. त्यामुळे रात्री आठ वाजता गंगापूर धरणातून दोन हजार ८०० क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला.
शहरात रविवारी व सोमवारी जोरदार पाऊस झाला; मात्र मंगळवारी जोर ओसरला सकाळी साडेआठ वाजेपासून रात्री साडेआठपर्यंत ६.६ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे. संध्याकाळी साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान ४.९ मि.मी. पाऊस झाला. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्ये सुरुवात झाली होती; मात्र पावसाचा जोर नसल्यामुळे शहरात कमी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूरच्या समूहाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली गावच्या परिसरात सर्वाधिक ६० मि.मी. इतका पाऊस पडला. तसेच हरसूल, वाघेरा, चिंचवड परिसरातही दुपारी जोरदार पाऊस झाला. यामुळे कश्यपी धरणाच्या पातळीतही वाढ झाली होती. कश्यपीच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मि.मी. इतका पाऊस पडला. यामुळे काश्यपीमधून ६४६ तर आळंदीमधून २४३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमध्ये करण्यात आल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली होती. यामुळे रात्री विसर्ग वाढविण्यात आला. गोदापात्रात गंगापूरमधून २८३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले होते. रात्री आठ वाजेनंतर होळकर पुलाखालून ३५९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग पुढे सुरू होता.