पाणीबचतीचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:46 PM2018-09-22T23:46:38+5:302018-09-24T19:10:00+5:30
पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.
पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. महापालिकेतून पाणीपुरवठा झालेले पाणी आपण फक्त पिण्यासाठी वापरले पाहिजे. आणि इतरांनाही तोच नियम लागू पडतो. नागरिकांनी आपली वाहने धुण्याऐवजी बादलीभर पाण्यात ती स्वच्छ पुसून काढली आणि फरशी आणि गाडी पुसलेले पाणी झाडांना टाकले तर बाराही महिने झाडे हिरवीगार राहतील. कित्येक गावांमध्ये जिथे टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा ठिकाणी स्त्रिया पाण्याचा जपून वापर करतात. पाण्याचा पुनर्वापर करतात. नाशिक परिसरात एवढी पाणीटंचाई जाणवत नाही; पण नाशिकमधील पावसाचे, गोदावरी नदीचे पाणी पुढे मराठवाड्यातील कित्येक गावांना पुरविले जाते. म्हणून आपण सर्वांनी पाणी वाचविणे आणि ते जपून वापरणे जरुरीचे आहे. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात जमिनीतील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. तेव्हा पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत कसे मुरविता येईल याकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात छतावर पडलेले पाणी थोडेसे टाळून जमिनीखाली बनविलेल्या टाकीत साठवून ठेवले तर अनेक वर्षं ते पाणी वापरता येईल. याला (रेन वॉटर हार्वेस्टिंग) पावसाचे पाणी साठविणे म्हणतात. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी शोषखड्ड्यात साठविले जाते आणि ते पाणी जमिनीत मुरते. बऱ्याच मोठ्या संस्था ही कामे करीत आहेत.
...हे करता येईल!
प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक घरात पाणी वाचविले गेले तर पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. नाशिक हे औद्योगिक शहर आहे. नाशिकला बºयाच कंपन्या आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये पाणी वापरले जाते. कारखाने, कचेºयातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी पाण्याचा योग्य वापर होतो आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्याच्या शुद्धतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे, पाणी दूषित होणार नाही यासाठी उपाययोजना महत्त्वाची आहे.
नाशिकमध्ये जलतरण तलाव खूप आहेत. सरकारी आणि खासगी जलतरण तलावांना बरेच पाणी लागते. तेथेही पाण्याची बचत होऊ शकते. आजकाल जिकडे तिकडे शॉपिंग मॉल्स बघायला मिळतात. तिथेही पाण्याचा अपव्यय टाळता येईल. गाड्या धुण्यापेक्षा, घरातील फरशा, धुण्यापेक्षा त्या ओल्या कपड्याने पुसण्यावर भर द्यावा.
- डॉ. सुवर्णा तांबडे