पाणीप्रश्नी मंत्र्यांना साकडे

By admin | Published: November 22, 2015 10:09 PM2015-11-22T22:09:07+5:302015-11-22T22:18:54+5:30

कसमादे : चणकापूर, पुनंद, केळझर, हरणबारी प्रकल्प सुरक्षित ठेवण्याची मागणी

Water minister questions ministers | पाणीप्रश्नी मंत्र्यांना साकडे

पाणीप्रश्नी मंत्र्यांना साकडे

Next

कळवण : कळवण तालुक्यातील चणकापूर, पुनंद व बागलाण तालुक्यातील केळझर, हरणबारी या जलप्रकल्पांसह तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी गिरणा धरण भरण्यासाठी पाणी सोडू नये, या प्रमुख मागणीसाठी कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन देऊन साकडे घातले.
कळवण तालुक्यातील जनतेचा जळगावला पाणी सोडण्यास असलेल्या विरोधाचे ८५ ग्रामपंचायतींचे ग्रामसभांचे ठराव व निवेदन यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सुभाष शिरोडे यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे सुपूर्द केले
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कळवण तालुक्यातील १५२ गावांची आणेवारी ही ५० पैशांच्या आत असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींनीदेखील तळ गाठला असून, ऐन हिवाळ्यात तालुक्यातील गाव, वाड्या-वस्तींवर पाणीटंचाई भासू लागली आहे.
कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यांतील जनतेला वरदान ठरणाऱ्या पुनंदसह चणकापूर, केळझर, हरणबारी या जलप्रकल्पांसह तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पातून २५ टक्के पाणी गिरणा धरणात सोडण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू असून, महसूल व पाटबंधारे विभाग यासंदर्भात नियोजन करीत आहे.
कसमादे पट्ट्यातील या धरणामध्ये आजअखेर ५ हजार ३७८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, हा पाणीसाठा ३१ जुलै २०१६ पर्यंत पुरवावा लागणार आहे. सलग ३ ते ४ वर्षांपासून कसमादे पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. धरणे भरल्यामुळे कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अपुऱ्या पावसामुळे विहिरींनीदेखील तळ गाठला असून, कसमादे पट्ट्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात तालुक्यातील गाव, वाड्या-वस्तींवर पाणीटंचाई भासू लागली आहे. चणकापूर उजव्या कालव्याअंतर्गत चणकापूर धरणातून रामेश्वर धरणात पाणी सोडून देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावांना पाणीपुरवठा होतो. पुनंद धरणातून सिद्धेश्वर पिकअप वेअरमधून सुळे उजवा व डावा कालव्याद्वारे पाणी कळवण, देवळा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
उन्हाळ्यात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहणार आहे. अशी परिस्थिती असताना जळगावला पाणी देणे अन्यायकारक ठरेल. चणकापूरसह हरणबारी जलप्रकल्पावर पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, आर्वतनाच्या पाण्यातून गिरणा नदीकाठावरील कळवण, अभोणा, बार्डे, कळमथे, पाळे, एकलहरे, मानूर, नाकोडे, बेज, भऊर, विठेवाडी, पिळकोस, लोहोणेर यांसह मोसम नदीकाठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी भरून घेतल्या जातात. गिरणा धरणासाठी कसमादे पट्ट्यातील जलप्रकल्पासह लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर धरणे रिकामे राहण्याची आणि अनेक पाणी योजना संकटात सापडून पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती असल्याने जळगावला पाणी सोडण्यास तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी विरोध दर्शविला आहे, हे लक्षात घेऊन शासनाने जळगावला पाणी सोडू नये.
शिष्टमंडळात पांडुरंग कनोज, मधुकर जाधव, शांताराम जाधव, साहेबराव जाधव, जगन्नाथ पाटील, जयराम पगार, अमृता वाघ, शिवाजी पगार, मनोहर बोरसे, भाऊसाहेब
पगार, हेमंत वाघ, लोटन गांगुर्डे,
प्रवीण रौंदळ, विलास रौंदळ, सागर खैरनार, रामा पाटील, विठोबा बोरसे, कैलास जाधव, प्रकाश जाधव, उमेश सोनवणे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Water minister questions ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.