तलावातील पाण्याचा उपसा
By admin | Published: October 31, 2015 12:05 AM2015-10-31T00:05:14+5:302015-10-31T00:07:18+5:30
नेचर क्लबचे सर्वेक्षण : हरणांची पाण्यासाठी वणवण; वनविभागाचे मात्र दुर्लक्ष
नाशिक : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांची संख्या असल्याने या हरणांच्या संवर्धनासाठी उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या उपायोजना केवळ फसव्या असून, यामुळे हरणांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हरणांसाठी असलेल्या तलावाच्या पाण्याचा बेकायदेशीररीत्या उपसा होत असतल्याची बाब नेचर क्लॅब या संस्थेने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे.
येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, नगरसूल, भारम, कोळम या भागात जेथे हरीण, काळवीट यांचे अस्तित्व आहे. या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यावर जनावरे येत असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणी गढूळ होत असून, पाण्याची पातळीदेखील कमी होत असल्याचा आक्षेप संस्थने नोंदविला आहे.
या प्रकाराकडे मात्र वनविभाग आणि पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नगरसूलपासून हाकेच्या अंतराव कोळगावजवळ कानिफनाथ बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये हरणे, काळवीट पाणी पिण्यासाठी जात असतात. पण अलीकडे येथील पाणी कमी होत असल्याने जनावरे पाणवठ्यावर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हरणांना पाणी मिळावे यासाठी वनविभागाने वनतळे तयार केले आहे, परंतु वनतळे केवळ कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात या तळ्यामध्ये पाणी टाकण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
नेचर क्लबने केलेल्या सर्र्वेक्षणानंतर त्यांनी काही मागण्या केल्या आहेत त्यानुसार विहिरींना कुंपण घालणे, राखीव क्षेत्रातलाही जाळ्यांचे कुंपण लावावे, पाण्याचे नियोजन करावे, गस्ती पथकाची नेमणूक करावी, हरणांसाठी कृत्रिम तलावात पाणी टाकणे, रस्त्यावर हरणांना होणारे अपघात टाळण्यासाठीच्या उपायोजना करावी, अशी मागणी नोंदविण्यात आली
आहे. (प्रतिनिधी)
संरक्षित क्षेत्र नावालाच
काही महिन्यांपूर्वी हरणांच्या संवर्धनासाठी येथील क्षेत्र ममदापूर हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु ही तरतूद केवळ कागदावरच असून, प्रत्यक्षात अद्याप काहीच काम झालेले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. परिसराला कुंपण घालणे, पाण्याचे हौद भरणे, गावामध्ये जनजागृती करणे, विहिरींना कठणे बांधणे, संवर्धन क्षेत्राचा विकास करणे ही कामे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले नाही. केवळ कागदी कामकाज करण्यात आले असून, काळवीट, हरीण संवर्धनासाठी मात्र मनापासून प्रयत्न होताना दिसत नाही.