फांगुळगव्हाण परिसरातील पाणीप्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:12 PM2020-06-07T22:12:03+5:302020-06-08T00:28:33+5:30
फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
इगतपुरी : तालुक्यातील फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यानिमित्ताने गावातील एकोप्याचे दर्शन घडले असून, इतर गावांसाठी हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे.
अनेक वर्षांपासून फांगुळगव्हाण, शिवाजीनगर भागात पाण्याची समस्या पाचवीलाच पूजलेली होती. उन्हाळ्यात जलवाहिनीद्वारे पाणी येते, मात्र पावसाळ्यात विजेची अडचण, मशीन वारंवार बिघडणे यामुळे पाण्याची समस्या जाणवत होती. पावसाळ्यात महिलांना निसरड्या बांधांवरून ५०० मीटर अंतरावर पायी चालत जावे लागत असे. बांधावरून घसरल्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.
या भागात एकही विहीर नसल्याने व गावची पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाणी समस्या उद्भवणार होती. मात्र, येथील सेवाभावी तरुण धनराज म्हसणे, ईश्वर चव्हाण यांनी गावातील तरुणांना एकत्र करत लॉकडाऊनच्या सुट्टीचा व वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रस्ताव समोर आणला. या परिसरात विहीर खोदण्याचा व विहिरीपर्यंत रस्ता साकारण्याचा विचार ग्रामस्थांपुढे मांडला. यावर कृष्णा आंदाडे, रायबा भगत, खुशाल चव्हाण, भगीरथ म्हसणे, रतन म्हसणे, धनराज भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ भटाटे, दिनेश आंदाडे, चंद्रकांत गतिर, आक्षय चव्हाण, आजय म्हसणे, बाळू आंदाडे, हरिभाऊ म्हसणे, राममकिसन म्हसणे, प्रमोद म्हसणे आदी तरुणांनी विहीर खोदायच्या कामाला सुरुवात केली. या कामासाठी भगवान महाराज म्हसणे, राजीव कुमार, शक्ती उपाध्याय, व्यंकटेश भागडे, तलाठी ठाकरे, ग्रामसेवक सानप, वैभव गगे व शिवप्रेमी मित्रमंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.
तरुण करीत असलेले काम पाहून शिवाजीनगरमधील आबालवृद्धांनीही यथाशक्ती मदत केली. अवघ्या पाच दिवसांत २० फूट खोल विहीर खोदली. परिसरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने विहिरीच्या कठड्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले. बांधकाम कारागीर सुभाष म्हसणे, आशोक म्हसणे, हरिश्चंद्र भागडे, राजू भागडे, सोमनाथ म्हसणे, मनोहर म्हसणे, रतन म्हसणे यांनी विनामूल्य काम पूर्ण केले.