पुणेगाव कालव्याचे पाणी केद्राईत की दरसवाडीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 05:43 PM2019-08-21T17:43:26+5:302019-08-21T17:43:54+5:30
संघर्ष पेटण्याची चिन्हे : भुजबळांपाठोपाठ अहेरांकडून पाहणी
चांदवड : मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर राष्टवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवाद उफाळून आलेला असतानाच चांदवड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव -दरसवाडी कालव्याच्या ६३ कि.मी. परसूल गावापर्यंत आलेल्या पाण्याचाही मुद्दा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कालव्याची आमदार छगन भुजवळ व आमदार डॉ. राहुल अहेर या दोहोंनी पाहणी करुन श्रेयवादाला तोंड फोडले आहे. सदर कालव्याचे पाणी केद्राई धरणात टाकण्याला भुजबळांनी अनुकूलता दर्शविली असताना सदर पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. अहेर यांनी घेतल्याने राष्टÑवादी-भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणेगाव-दरसवाडी कालवा व धरणाची पाहणी नुकतीच येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देवसाने मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव धरण भरले असून पुणेगाव दरसवाडी कालव्याद्वारे ५९/५०० कि.मी. पर्यंत पाणी पोहचले आहे. मात्र गळतीमुळे पाण्याचा विसर्ग धिम्या गतीने सुरू असल्याने कामातील दिरंगाई बद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. पुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर भुजबळ यांनी केद्राई धरणात पाणी टाकण्याबाबत अनुकूलता दर्शविली.
भुजबळ यांच्या पाठोपाठ चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहूल अहेर यांनीही परसूल शिवारात पाण्याची पाहणी केली. मागील झालेल्या चुका व कालव्यास ठिकठिकाणी असलेली गळती यामुळे या कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचत नव्हते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वंचित असल्याचे डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी सांगितले. मात्र, पुणेगाव परिसरातील नागरीकांच्या जमिनी गेल्या असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. भुजबळ व अहेर यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुणेगाव पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकरी केद्राईसाठी आग्रही
देवरगाव, दरसवाडी , उर्धुळ ,भोयेगाव येथील शेतक-यांची सदरचे पाणी परसुल मार्गे चढ असल्याने पाणी जात नाही त्यामुळे सदर पाणी केद्राई धरणात टाकून नंतर ते दरसवाडी धरणात सोडावे अशी मागणी आहे. त्यामुळे सरकार याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून असणार आहे.