जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:55 AM2018-06-19T01:55:31+5:302018-06-19T01:55:31+5:30
वसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार असून, आजारापासून मुक्ततादेखील मिळणार आहे.
नाशिक : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार असून, आजारापासून मुक्ततादेखील मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी या प्रकरणी आदेश दिले असून, जिल्ह्यात पाणी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासूनच ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
निफाड तालुक्यातील चाटोरी, सोनगाव, चांदोरी, शिवडी, विंचूर, रानवड, दारणा सांगवी, दिंडोरी-चास, औरंगपूर, ठाणगाव थडी, पाचोरे बु. टाकळी विंचूर, भुते, महाजनपूर आदी ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्येदेखील मोहीम राबविण्यात आली. अंगणवाडी व शाळेत वापरात येणाºया पाण्याच्या टाक्यांचीही स्वच्छता करण्यात आली. ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपांचेही शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक, जलसुरक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.