‘जलशुध्दीकरण केंद्र’ बनले ‘अशुध्द पाणीपुरवठा केंद्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:03+5:302021-06-04T04:12:03+5:30
सिन्नर (शैलेश कर्पे) : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त गावांसाठी वरदान ठरलेल्या वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र ...
सिन्नर (शैलेश कर्पे) : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त गावांसाठी वरदान ठरलेल्या वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र ‘अशुध्द पाणीपुरवठा केंद्र’ बनल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेकडून जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीसाठी सुमारे २६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. नुकतीच जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानंतरही योजनेतील गावांना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याने २६ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सुमारे १० वर्षांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी वावीसह ११ गाव पाणीपुरवठा राबविली होती. वावी, कहांडळवाडी, दुसंगवाडी, सायाळे, मिठसागरे, शहा, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मलढोण, मीरगाव या गावांचा यात समावेश करण्यात आला होता. १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराकडून या जलशुध्दीकरणाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अद्याप या योजनेतून अशुध्द व गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याला वास येत असून, नागरिकांना सदर पाणी केवळ वापरण्यासाठी उपयोग करण्याची वेळ आली आहे. पाणी गढूळ असल्याने नागरिकांना ‘जार’चे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेला सुमारे २६ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला की काय, अशी चर्चा सुरू आहे.
--------------------
वावी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेला गढूळ आणि अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वावी ग्रामपंचायतीने गावातील जलकुंभ स्वच्छ केले. मात्र, त्यानंतरही गढूळ पाणी येत असल्याने वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे यांच्यासह सचिन वेलजाळी, संदीप भोसले, भाऊसाहेब नरोडे, संपत चिने यांच्यासह ग्रामस्थांनी कोळगावमाळ येथील योजनेचा तलाव आणि जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. त्यावेळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी शुध्द होत नसल्याची बाब उघड झाली.
-------------------------
बाटली तिच लेबल बदलले...
वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेला गढूळ व अशुध्द पाणी येत असल्याने २६ लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पाण्यात काही सुधारणा झाली नाही. पाणी पूर्वीप्रमाणेच गढूळ येत आहे. जलशुध्दीकरण केंद्राला केवळ रंगरंगोटी करून चकाचक करण्यात आले. मात्र, पाण्यात कोणताही बदल झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बाटली तीच फक्त लेबल बदलले, अशी अवस्था जलशुध्दीकरण केंद्राची झाली आहे.
-------------------
अशुध्द पाणी बाहेर जाण्याची व्यवस्थाच नाही
जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द केल्यानंतर अशुध्द पाणी बाहेर टाकण्यासाठी आऊटलेट नसल्याचे दिसून आले. केवळ वॉश आऊट केल्यानंतर नावापुरते अशुध्द पाणी एका जवळच्या विहिरीत सोडले जाते. त्यातही सातत्य नाही. पाणी शुध्द करण्यासाठी आलम व अन्य औषधांचा वापर केल्यानंतर शुध्द होणारे पाणी व अशुध्द पाणी पुन्हा एकत्र होऊन तेच पाणी योजनेतील गावांना सोडले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.
--------------
मध्यंतरीच्या काळात या योजनेकडे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य लक्ष दिले नाही. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राची दुरवस्था होण्यासह गळती वाढली. जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाच्यावेळी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.
-विजय काटे, माजी अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना
--------------------------
वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करतांना वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, भाऊसाहेब नरोडे, संदीप भोसले, सचिन वेलजाळी, संपत चिने आदी. (०३ सिन्नर २)
===Photopath===
030621\03nsk_4_03062021_13.jpg
===Caption===
०३ सिन्नर २