पाणीप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:05 PM2020-01-29T22:05:50+5:302020-01-30T00:20:32+5:30
नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी दोन नळजोडण्याधारकांवर कारवाईची मागणी केली. ...
नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी दोन नळजोडण्याधारकांवर कारवाईची मागणी केली. अध्यक्षस्थानी सरपंच उषा रोकडे होत्या. ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेत ग्रामपंचायतीतर्फे सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर गावातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांची नावे सभेत वाचून दाखविण्यात आली. पाणीपुरवठा विषयावर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.
माजी सदस्य लक्ष्मण मुसळे, सुधाकर बोराडे यांनी, गावातील दोन नळजोडण्याधारकांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच रोकडे यांच्याकडे केली. यास ग्रामस्थांनी अनुमोदन दिले. सभेत गावातील सांडपाणी, जुनी गटारव्यवस्था, नांदूरवैद्य ते अस्वली रस्ता, पाणीप्रश्न आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गावामध्ये दारूबंदी यासह इतर
अवैध धंदे बंद करण्यासाठी शासनाकडून ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याविषयी ग्रामविकास अधिकारी शेलावणे यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थींच्या खात्यावर निधी जमा न झाल्यामुळे ते लवकरात लवकर वर्ग करावे, अशी मागणी कुंडलिक मुसळे यांनी केली. सभेला अॅड. चंद्रसेन रोकडे, उपसरपंच पोपटराव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य नितीन काजळे, केशव डोळस, पंढरीनाथ मुसळे, विकास कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष काशीनाथ तांबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
..अन्यथा पाणीपट्टी- घरपट्टी थकबाकीदारांवर कारवाई
घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसीद्वारे समज देण्यात येणार आहे. यानंतरही सदर व्यक्तीने थकबाकी रक्कम भरली नाही तर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामसभेत ठरले.
ग्रामस्थांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच उषा रोकडे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले.