चाचणीच्या नावाखाली नांदूरमध्यमेश्वर धरणातून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:23+5:302021-07-08T04:11:23+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच भर म्हणून सोमवारी पाटबंधारे ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच भर म्हणून सोमवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेस्टिंगच्या नावाखाली नांदूरमधमेश्वर धरणाचे तीन गेट खोलून हजारो क्यूसेक पाणी वाया घालविले त्यामुळे विनाकारण पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदीवर असणाऱ्या नांदूरमधमेश्वर धरणातून गोदाकाठच्या सुमारे ३० गावांना तसेच निफाड शहर व लासलगाव १६ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा केला जातो. धरणात असलेला पाणीसाठा मर्यादित स्वरूपाचा असताना व पाऊस झालेला नसताना अधिकाऱ्यांनी गेट टेस्टिंगच्या नावाखाली हजारो क्यूसेक पाणी सोडल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. गोदाकाठचे हक्काचे पाणी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला आहे. त्यामुळे त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
---------------
धोकादायक पानवेली
गोदापात्रातील पानवेलीमुळे सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना गेल्या तीन महिन्यांपासून अतिशय संथ गतीने पानवेली काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू असून त्यास गती देण्याची विनंतीही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ व जलसंपदामंत्री यांना मेल केल्या आहेत.