पुणेगाव कालव्यास पाणी सोडले
By admin | Published: August 27, 2016 12:32 AM2016-08-27T00:32:04+5:302016-08-27T00:32:28+5:30
शुभ वर्तमान : चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली
गोरख घुसळे पाटोदा
गेल्या ४४ वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या पुणेगाव- दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास कडवा कालवा विभागाने आश्वासन दिल्याप्रमाणे शुक्रवारी (दि. २६) दुपारी ४.३० वाजता चाचणीसाठी ५० क्यूसेक पाणी सोडले आहे. कालव्यास पाणी सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओव्हरफ्लोच्या पाण्याने येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी यासाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली कातरणी येथे कालव्यावरच सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी २३ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी सात ते आठ उपोषकर्त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन उपोषणार्थीची भेट घेऊन चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखीपत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनती केली होती.
येवला-चांदवड तालुक्यांना संजीवनी ठरणाऱ्या या दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत पूर्ण झाले असून, पुढे किरकोळ अपवाद वगळता डोंगरगावपर्यंत कालव्याचे काम पूर्ण झालेले आहे. पुणेगावच्या वाहून जाणाऱ्या पाण्याने कालव्याची चाचणी घेण्यास योग्य वेळ असल्याचे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या बाबत शेलार व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागास १८ आॅगस्टरोजी पत्र देवून कालव्याची ओव्हरफ्लोच्या पाण्याने चाचणी घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र संबधित विभागाने चाचणीसाठी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यास असमर्थता दाखिवली होती. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी २३ आॅगस्टपासून कातरणी कालवा परिसरात उपोषणास बसले होते.त्यांच्या या आंदोलनास यश आले असुन या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या ४४ वर्षापासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.