जलस्रोत कोरडेठाक : पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्याची मागणी येवला तालुक्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:13 AM2018-05-11T00:13:59+5:302018-05-11T00:13:59+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आग्रही मागणी वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर हे तालुक्यातील मोठे खेडे आहे. या परिसरात ममदापूर संवर्ध राखीवदेखील आहे. परंतु राजापूर गावाची उन्हाळ्यात पाण्याची तहान भागत नाही. गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु परिसरातील वाड्या वस्तीवरील पाण्याचे काही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा व गावातील टॅँकरच्या खेपा वाढवाव्या. राजापूर येथील अलगट वस्ती, सानप वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी, वाघ वस्ती या मोठ्या वस्ती असूनही या वस्त्यांमध्ये जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शंकर अलगट, सागर अलगट, गोकूळ वाघ, संतोष चव्हाण, बबनराव वाघ, नितीन अलगट, सुभाष अलगट, आनंदा वाघ यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
जलस्रोत कोरडेठाक
येवला तालुक्यातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट तीव्र होत चालले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असून, हंडाभर पाण्यासाठी महिलावर्ग व नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. माणसाबरोबरच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालखेड कालवा विभागाने तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे व लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाझर तलाव पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी होत आहे. पाणी प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील चाळीस गावांना आज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे व पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील हे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी पालखेड कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे व पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांमधील पाझर तलाव पाण्याने भरून दिल्यास काही अंशी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी रतन बोरनारे यांनी केली आहे.