हागणदारीमुक्ती योजनेला पाणीटंचाईची आडकाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:38 PM2021-03-30T23:38:42+5:302021-03-31T01:13:28+5:30
लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाने हागणदारी मुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने काटेकोर अंमलबजावणी सुद्धा केली गेली. परंतु उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीती वर्तविली जात असल्याने या महत्त्वपूर्ण योजनेला खीळ बसते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता काही ठिकाणी लोटा बहादरांचे दर्शन घडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईमुळे अशी परिस्थिती निर्माण होईल याचे जणू हे लोटाबहादर संकेत तर देत नसतील ना? अशी चर्चा काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे.
स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गाव पातळीवर गुडमाँर्निग पथक तयार करून हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळेत उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होण्याचा प्रशासनाने प्रयोग केला. परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असते. त्यात शौचालयासाठी मुबलक पाणी आणायचे कोठून असा गहन प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा राहत आहेत. येणाऱ्या काळात पाणीटंचाई हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभियानाला अडथळा बनण्याच्या मार्गावर दिसत आहे. ही समस्या जर दूर करायची असेल तर आताच नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शासनाच्या या योजनेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा, असे जाणकारातून बोलले जात आहे.