नायगाव खोऱ्यात पाणीटंचाईचा पंधरवडा
By admin | Published: May 22, 2017 01:53 AM2017-05-22T01:53:27+5:302017-05-22T01:53:37+5:30
नायगाव : नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे नायगाव खोऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे पंधरा दिवसांपासून नायगाव खोऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नायगाव खोऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे.
सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील गावांना नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना वरदान ठरली आहे. योजनेत सहभागी गावांना या योजनेद्वारे तीन वर्षांपासून दिवसाआड नियमीत पाणी पुरवठा होत होता. भर उन्हाळ्यातही सदर योजना सुरळीत चालत असल्याने नायगाव खोऱ्याची पाण्यासाठीची वणवण थांबली होती.
दरम्यान, वर्षभरापासून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या नाशिक-सिन्नर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेची चेहडी ते मोहदरी गावापर्यंतची जलवाहिनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने टाकण्यात आली होती.
सध्या सदर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने जेसीबी, पोकलेन या यंत्रांचा धक्का पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वाढले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जेसीबीचा धक्का लागून शिंदे गावानजीक जलवाहिनी फुटली आहे. पंधरा दिवस उलटूनही जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने सदर योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे योजनेत सहभागी गावांमध्ये तीव्र पाणी निर्माण झाली आहे. उन्हाळा तीव्रतेच्या ऐन शिखरावर असतांना नायगाव खोऱ्यातील सर्व जलस्त्रोत कोरडेठाक झाले आहेत. अशा परिस्थितीत नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेचाच सर्व गावांना आधार आहे.
तथापि, योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून होत असलेली पाणी चोरी, दारणा नदीपात्रातील आटलेले पाणी व महामार्ग रुंदीकरणामुळे वारंवार फुटणारी जलवाहिनी यामुळे नायगाव खोऱ्यातील गावांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.