येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 09:11 PM2020-04-06T21:11:33+5:302020-04-06T21:12:25+5:30
सायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.
तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेती व्यवसाय विशेषत: निसर्गावरच अवलंबून आहे. पर्यायी पाटपाण्याची सुविधा नसल्याने या भागातील रब्बी हंगामातील पिकांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शेतकरी खरीप हंगामातील मिळालेली मिळकत व कर्जावू घेतलेला पैसा रब्बीचे पिके वाचविण्यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्याचा केविलवाणा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आला आहे.
साठ फूट खोलीची विहीर खोदून बांधायची म्हटल्यावर चार ते पाच लाखांचा खर्च येतो. सरासरी दोनशे फूट बोअरवेल्स घ्यायचा तर १५ हजार रुपये लागतात. पर्यायी पाट पाण्याची सुविधा नसलेल्या उत्तर-पूर्व भागातून दरवर्षी
कोट्यवधी रुपये खर्च होताना दिसतात. त्यात शंभरात एखाद्या विहिरीला अथवा बोअरला पाणी लागते, तेही दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर-पूर्व भागातील सुमारे ६० खेड्यांतून दरवर्षी ३०० विहिरी नव्याने खोदल्या जातात तर हजारो बोअरवेल्स घेतले जातात.कोट्यवधींचा जुगारतालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४३८ मिलिमीटर इतके आहे. यंदाच्या हंगामात विक्र मी पर्जन्य होऊनही उत्तर - पूर्व भागाला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी विहिरी, बोअरवेल्स वाढतच आहे. मात्र रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र वाढताना दिसत नाही. याचा अर्थ पाण्याच्या शोधार्थ नाशिबावर हवाला ठेवून शेतकरी दरवर्षी कोट्यवधीचा जुगारच खेळतो आहे.