वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईच्या झळा
By admin | Published: March 2, 2016 11:07 PM2016-03-02T23:07:12+5:302016-03-02T23:08:57+5:30
नांदूरशिंगोटे : टॅँकरच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी
नांदूरशिंगोटे : येथील एकलव्यनगरातील (ठाकरवाडी) सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे. वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पाच वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीस टंचाई जाणवू लागल्याने जून महिन्यापर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. इतर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.
एकलव्यनगर (ठाकरवाडी) भागातील लोकसंख्या सुमारे पाचशे असून, दीडशेच्या आसपास कुटुंबे आहेत. सहा वर्षांपूर्वी येथील वाडी-वस्त्यांसाठी नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. येथील पाणीपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक विहीर आहे. परंतु, दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीस विहीर तळ गाठण्यास सुरुवात होत असल्याने असल्याने पाणीटंचाई भासू
लागते. पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने नद्या-नाले, विहिरी, बंधारे, पाझर तलाव, केटिवेअर कोरडेठाक पडत आहेत. इतर जलस्रोत उपलब्ध नसल्याने आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी
लागत आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम शेती व
दुग्ध व्यवसायावर झाला आहे.
कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे व काही वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. परंतु, ज्या वाड्या-वस्त्यांचा समावेश नाही तेथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. प्रशासनाने वाड्या-वस्त्यांवर त्वरित टॅँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, तलाठी, पंचायत समिती, तहसील कार्यालय यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य वाळिबा मेंगाळ, त्र्यंबक मेंगाळ, धनलाल मेंगाळ, पंढरीनाथ मेंगाळ, हौशीराम मेंगाळ, रामचंद्र मेंगाळ, रखमा मेंगाळ, गंगाराम मेंगाळ, सोमनाथ आगिवले, उमा पथवे, महादू मेंगाळ, पार्वता शेळके, पार्वता मेंगाळ, हिराबाई मेंगाळ आदिंसह आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)