पाणीटंचाईचा डाळिंब बागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 04:33 PM2019-01-25T16:33:13+5:302019-01-25T16:33:51+5:30
विकतही पाणी मिळत नसल्याने बागा तोडण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की ठाणगाव व पाटोदा येथील शेतकºयांनी डाळिंब बागा केल्या भुईसपाट पाटोदा : ...
विकतही पाणी मिळत नसल्याने बागा तोडण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की
ठाणगाव व पाटोदा येथील शेतकºयांनी डाळिंब बागा केल्या भुईसपाट
पाटोदा : यावर्षी परिसरात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे फळबागा अडचणीत सापडल्या आहे. फळबागा जोपासणे अवघड झाले आहे. बागेसाठी कुठेच पाणी उपलब्ध होत नाही, कुठे उपलब्ध झाले तर टँकरचा खर्च परवडत नाही त्यामुळे काय करावे या द्विधा मन:स्थितीत या भागातील शेतकरी सापडले आहे. त्यामुळे डाळिंब व द्राक्ष बागा तोडण्याची नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. पाणीटंचाईमुळे फळ धारणाही होत नसल्याने तसेच बागेवर खोडकीड व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ठाणगाव येथील अनिल बबन जाधव यांनी आपली एक एकर डाळिंब बाग मुळासकट ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली तर पाटोदा येथील शेतकरी अनिल सुकदेव गुंड या शेतकºयाने आपली दोन एकर डाळिंब बाग मजुरांच्या मदतीने कुºहाडीने तोडून टाकीत आपला संताप व्यक्त केला आहे.
संपूर्ण येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी वर्ग पर्यायाने शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या भागात शेकडो हेक्टर डाळिंब तसेच द्राक्ष बागा आहेत. पोटच्या मुलाबाळांप्रमाणे जीव लावलेल्या बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. उपलब्ध पाण्यावर शेतकरी बागा जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे; मात्र त्यांना यश येत नाही. यावर्षी परिसरात संपूर्ण पावसाळ्यात रिमझिम पाऊस झाल्याने खरीप हंगाम व त्यानंतर रब्बी हंगामही वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरींना थेंबभरही पाणी न उतरल्याने भयाण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात नाही तर नंतर का होईना बेमोसमी पाऊस पडेल अशी शेतकºयांना आशा होती; मात्र त्यानंतरही परिसरात पाऊस पडलाच नाही, त्यामुळे विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत झाल्याने पिके ब बागा जगविणे अवघड झाल्याने या शेतकºयांनी बागांना जमीनदोस्त केले आहे. ठाणगाव येथील तरु ण शेतकरी अनिल बबन जाधव यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी आपल्या एक एकर शेतात डाळिंब लागवड केली होती; मात्र दरवर्षी कमी कमी होत जाणाºया पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होत असल्याने बाग जगविणे अवघड झाले. पाण्याच्या कमतरतेमुळे झाडांना खोडकीड तसेच तेल्या या सारख्या रोगांनीही थैमान घातल्याने त्यांनी आपली डाळिंब बाग जमीनदोस्त केली आहे. पाण्याअभावी डाळींब बाग अखेरची घटका मोजू लागल्याने पाटोदा येथील अनिल गुंड या शेतकºयानेही आपली दोन एकर डाळिंब बाग मजूर तसेच स्वत: कुºहाडीने संपूर्ण डाळिंब बाग भुईसपाट करून संताप व्यक्त केला आहे. गुंड यांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी आपल्या शेतात सेंदरी या वाणाची लागवड केली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी ड्रिपची व्यवस्था केली होती; मात्र भीषण दुष्काळाचा फटका या बागेलाही बसला त्यामुळे संपूर्ण बाग सुकून चालली होती. विहिरीत थेंबभरही पाणी नसल्याने टॅँकरद्वारे पाणी आणून बाग जगविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला; मात्र यश न आल्याने त्यांनी आपल्या डाळिंब बागेला भुईसपाट केले.
*येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात ठाणगाव, कानडी, आडगाव रेपाळ, विखरणी, कातरणी, दहेगाव, पाटोदा, पिंपरी व परिसरात हजारो एकर द्राक्ष तसेच डाळिंब बागा आहेत; मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून पर्जन्यमान कमीकमी होत चालल्याने बागा जगविणे अवघड होत आहे. त्यातच यावर्षी भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने बागा सुकू लागल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी द्राक्ष तसेच डाळिंब बागा तोडण्याचा सपाटा लावला आहे.
* पाटोदा परिसराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण विहिरी व बोअरवेल केव्हाच कोरडेठाक पडले आहेत, त्यामुळे शेतकरी बागा वाचविण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणून बागांना देण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र टँकरने पाणी आणण्यासाठी एका खेपेला पाच सहा हजार रु पये खर्च येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
* यावर्षीच्या भीषण पाणीटंचाईमुळे संपूर्ण बाग सुकून गेली. उपलब्ध पाण्यावर बाग जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु बाग वाचविण्यात यश न आल्याने बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. - अनिल सुकदेव गुंड, डाळिंब उत्पादक शेतकरी, पाटोदा.
* डाळिंब बागेवर खोडकीड तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तसेच भीषण पाणीटंचाईमुळे बाग सुकू लागली, बाग वाचविण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने यामुळे अडचण निर्माण झाली. अगदी निराशेतून बाग तोडावी लागली. - अनिल बबन जाधव, डाळिंब उत्पादक शेतकरी, ठाणगाव.