पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:44 AM2019-04-14T00:44:52+5:302019-04-14T00:47:30+5:30
पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
तालुक्यात जवळपास २०० गावे-वाड्या असून, पैकी दरवर्षी १०० वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात परिसरात मोेठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी सिंचन प्रकल्पांची वानवा असल्याने उन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची दयनीय अवस्था तालुक्यात पहावयास मिळते.
तालुक्यात लहान-मोठी अशी आठ धरणे आहेत; मात्र त्यांची क्षमता कमी असल्याने सिंचनक्षेत्रही त्याच मर्यादेत येत असल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यावर्षी पेठ तालुक्याची पावसाची सरासरी समाधानकारक दिसत असली तरीही प्रारंभीच्या काळात पडलेला पाऊस शेवटपर्यंत टिकून न राहिल्याने खरिपाची पिके वाया जाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी रानातून गावातील घरी आणावे लागते. भीषण पाणीटंचाईमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, गावे ओस पडू लागली आहेत. सध्या निवडणुकांचा धुराळा उडत असल्याने राजकारण्यांचे पाणी व रोजगारापेक्षा निवडणुकांकडे अधिक लक्ष लागून असल्याने सध्या तरी केवळ प्रशासनावर टंचाई निवारणाची भिस्त आहे. आदिवासी भागातील वाडी-वस्तीवर भीषण पाणीटंचाईमुळे स्थलांतर करण्याची नागरिकांवर वेळ आली असून, शासन टंचाई निवारणासाठी करीत असलेल्या अपूर्ण उपाययोजना व नियोजनाचा अभाव यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमसारख्या सामाजिक संस्थांनी आपला हात पुढे केला आहे. शासन अनुदानातून रखडलेल्या पाणी योजना लोकसहभागातून पूर्णत्वास नेऊन सोशल नेटवर्किंग फोरमने आदिवासी भागातील जवळपास ११ गावे टंचाईच्या कचाट्यातून मुक्त केली आहेत. तसेच आपुलकी सामाजिक सेवाभावी ग्रुपच्या वतीने गावांना व शाळांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करून या टंचाईच्या झळांपासून नागरिकांना मुक्त करण्याचे काम केले आहे.पेठ तालुक्यात आठ लघुसिंचन प्रकल्प असले तरी त्यापैकी हरणगाव व इनामबारी या दोन धरणांतून कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बाकी छोट्या धरणांचे पाणी उन्हाळ्यात नदीपात्रात सोडल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांना जीवदान मिळू शकेल. सध्या नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने जनावरांचा पाणीप्रश्न बिकट झाल्याने त्यांनाही पाण्याची उपलब्धता होऊ शकेल म्हणून किमान दोन-तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.