त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:33 PM2021-05-13T22:33:38+5:302021-05-14T00:59:59+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार दिवस पुरेल एवढे पाणी असले तरी प्रस्ताव फेटाळला जातो. अशा वेळी टीसीएल वगैरे जंतूनाशक वापरुन का होईना अशा विहिरीचे पाणी प्यावे लागत आहे.
टंचाईग्रस्त गाव त्यांच्या वाड्या, पाडे यांचा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर होऊन ग्रामसेवक असे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात कारवाईसाठी पाठवतात. त्यानंतर टंचाई शाखेचे संबंधित क्लर्क तो प्रस्ताव त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयात पोहोच करतात. त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला व तेथून टंचाई शाखेकडे प्रस्ताव पाठवला जाऊन तो मंजूर होण्यास वेळच लागतो. पण प्रस्ताव मंजूर होण्यापुर्वी परत तो पडताळणीसाठी पाठवला जातो.
या पडताळणीमध्ये सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली जाते. ४/५ दिवस पुरेल अशा विहिरींचे दूषित पाणी प्यायल्याने मग उलट्या डायरिया आदींचा ग्रामस्थांनी त्रास सहन केला आहे. तर काही वेळा साथीचे रोग उद्भवतात. अशा विहिरीचे पाणी संपले की तो प्रस्ताव मंजूर होण्यास तीन आठवडे किंबहुना महिनाभर तरी लागतो. त्यानंतर टँकर किंवा विंधन विहीर जसे टंचाई आराखड्यात नमूद केलेले असते तशी उपाययोजना केली जाते.
सध्या मुरंबी वेळुंजेचा हेदपाडा वेळे सोमनाथनगर मुळेगाव व विनायक नगरचा प्रस्ताव आला होता. पण विनायक नगर येथे ठक्करबाप्पा योजनेतून विहीर घेतली होती. त्या विहिरीत ४/५ दिवस पुरेल एवढे पाणी होते. म्हणून जिप लपाचे उपअभियंता यांनी विनायक नगरीचा प्रस्ताव फेटाळला.