१०९ गावे, १९ वाड्यांना पोहोचणार पाणीटंचाईची धग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:02+5:302021-03-09T04:17:02+5:30

तालुक्यात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, माळमाथा पाणीपुरवठा योजना , २६ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव पाणी पुरवठा योजना ...

Water scarcity will reach 109 villages and 19 wadis | १०९ गावे, १९ वाड्यांना पोहोचणार पाणीटंचाईची धग

१०९ गावे, १९ वाड्यांना पोहोचणार पाणीटंचाईची धग

Next

तालुक्यात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, माळमाथा पाणीपुरवठा योजना , २६ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव पाणी पुरवठा योजना तसेच स्थानिक ग्रामपंचायतींच्या पाणी पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांद्वारे तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही , तरीही टंचाईची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर मात करण्यासाठी पाणी टंचाई कृती नियाेजन आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात कुठेही पाणी टंचाई जाणवली नाही. जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यानचा दुसरा टप्पा सुरु आहे. यातही अद्याप पाणी टंचाई समस्या जाणवली नाही. गरज भासल्यास आराखड्यानुसार ८९ गावे व १८ वाड्यांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. अखेरचा टप्पा एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा आहे. यात केवळ २० गावे व एका वाडीस पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. या गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रगतीतील नळ याेजना पूर्ण करणे, विंधन विहीर घेणे, नळ याेजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयाेजना, विंधन विहिरीची विशेेष दुरुस्ती, विहीर खाेल करणे, बुडकी घेणे, खाजगी विहीर अधिग्रहित करणे, टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे या स्वरुपात उपाय याेजनांचे नियाेजन झाले आहे.

इन्फो

यंदाही तालुका टँकर मुक्तीच्या दिशेने?

तालुक्यात मार्च २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत ६० टँकरच्या मदतीने १०४ गावांना पाणीपुरवठा सुरु हाेता. गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला हाेता. तरीही मे अखेर सावकारवाडी गावास १२ दिवस टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. या वर्षी पाऊस दमदार झाल्याने छाेटे - माेठे तलाव, विहिरींना आजही मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदाही तालुका टँकरमुक्त राहील असा दावा प्रशासकीय पातळीवरुन केला जात आहे. काही वाड्या-वस्त्यांना पाणी टंचाईची झळ बसू शकते या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या टंचाई शाखेने संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

Web Title: Water scarcity will reach 109 villages and 19 wadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.