पाणीयोजनांची पूर्तता व्हावी
By Admin | Published: May 10, 2016 10:12 PM2016-05-10T22:12:33+5:302016-05-10T22:13:16+5:30
पाणीयोजनांची पूर्तता व्हावी
प्रवीण दोशी वणी
पाणीटंचाईच्या तीव्रतेचा सामना करण्यासाठी वणी शहरासाठीची नूतन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असली, तरी पर्यायी उपलब्ध पाणीस्रोतावरील मर्यादा पाहता पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी योजनापूर्तीची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे. वणी हे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे शहरी वर्गात मोडणारे गाव असून, पंचवीस हजारांच्या पुढे लोकवस्ती आहे.
नवीन जलकुंभाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सरपंच मधुकर भरसठ, विलास कड, राजेंद्र गोतरणे, सुनील बर्डे, मनोज शर्मा आदि प्रयत्नशील आहेत. जलशुद्धीकरण केंद्र, सहा किलोमीटर नवीन जलवाहिनी, शहरातील काही भागात नवीन जलवाहिन्या, जलकुंभ अशा कामांचा प्रकल्पात समावेश आहे.
विविध तांत्रिक अडचणींचा सामना करीत जॅकवेल, पंपहाऊस, अशुद्ध जल पंप संयत्रे, अशुद्ध जल ऊर्ध्ववाहिनी या सर्व बाबींची पूर्तता अंतिम स्तरावर आहे. सन २००९-१० पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म राबविण्यात येत आहे. दोन कोटी ते साडेसात कोटींपर्यंतच्या स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना, तर पुढील मुख्य अभियंत्यांना आहेत. या सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेता नियमितपणे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेची पूर्ती होणे आवश्यक आहे.
नुकतीच पंचायतराज समितीने दिंडोरी तालुक्याला भेट देऊन तीन महिन्याच्या आत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. त्या सूचनेची पूर्तता झाली तरच शहराची पाणीटंचाई दूर होईल. दरम्यान, भातोडे, अहिवंतवाडी, मुळाणे, बाबापूर, तळेगाव व परिसरातील गावे, खेडे, पाडे पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत.
विहिरी, बोअरवेल काही ठिकाणी कोरडेठाक पडले आहेत, तर पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याची समस्या उभी ठाकली आहे. वेल रिचार्ज व रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा उपायांमुळे पाणीटंचाईची समस्या प्रभावीपणे सोडविली जाऊ शकते. मात्र त्यास गरज आहे जनजागृती व सांघिक प्रयत्नांची.