‘पाणीटंचाई’ने स्वच्छ भारत अभियान ‘धुतले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:40 PM2019-01-11T17:40:33+5:302019-01-11T17:40:47+5:30
सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यात आजपर्यंत सुमारे साडेतेरा हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे.
सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यात आजपर्यंत सुमारे साडेतेरा हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. कोट्यावधी रुपयांचे अनुदान वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी मिळाले असले तरी तालुक्यात पाणीटंचाईने सदर अभियान धुवून काढल्याचे चित्र आहे. अनेक गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे तेथे शौचालयाच्या वापरासाठी मुबलक पाणी कोठून मिळणार? त्यामुळे अनेक गावांतील वैयक्तिक शौचालये भंगार वस्तू साठवणुकीचे केंद्र बनल्याचे चित्र आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने २०११-१२ मध्ये केलेल्या पायाभूत सर्वेक्षणात तालुक्यात १७ हजार १७२ कुटुंबाना वैयक्तिक शौचालयाची गरज होती. २०१३-१४ साली वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून ४ हजार ६०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळत होते. १५ आॅगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्याबरोबरच वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी गावोगावची कुटुंबे पुढे येऊ लागली. आजपर्यंत सिन्नर तालुक्यातील १३ हजार ३५९ कुटुंबियांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानापासून अद्याप ४ हजार कुटुंब दूर आहेत. त्यांचे प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे सादर झाले असून त्याचे अनुदानही प्राप्त झाले असून त्याचे लवकरच वितरण केले जाणार आहे.
सिन्नर तालुक्यात साडेतेरा हजार कुटुंबियांना वैयक्तिक शौचाालयांचा लाभ मिळाला असली तरी त्याचा वापर ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल. तालुका अवर्षणग्रस्त असल्याने अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे शौचालयांचा वापर कितपत होते हा संशोधनाचा विषय ठरावा. अनेकांना प्रोत्साहनपर अनुदान घेतले आहे.