कालभैरवनाथ यात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: March 10, 2016 11:06 PM2016-03-10T23:06:23+5:302016-03-10T23:30:11+5:30
बोकटे : ३२ वर्षांची पाणी सोडण्याची प्रथा यावर्षी खंडित होण्याची शक्यता
अंदरसूल : बोकटे येथील कालभैरवनाथ हे अतिशय जागृत देवास्थानांपैकी एक मानले जाते. त्यामुळेच हे देवस्थान नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर परिचित आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात कालाष्टमीला बोकटे येथे मोठी यात्रा भरवली जाते. या यात्रेसाठी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, पुणे, मुंबई आदि जिल्ह्यांबरोबर महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून सुमारे पाच लाख भाविक हजेरी लावतात. तीन ते चार दिवस ही यात्रा सुरू असते. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या बोकटे येथील कालभैरवनाथ यात्रोत्सवावर यावर्षी मात्र पाणीटंचाईचे सावट असणार आहे.
राज्यासह नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे पालखेड धरण समूहात पाणीसाठा खूप कमी आहे. जानेवारी २०१४ या वर्षाचा पाणीसाठा ६५ टक्के इतका होता. या तुलनेत १ जाने. २०१६ च्या आकडेवारीनुसार २०१५ सालापर्यंत फक्त ४५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे, त्यात बाष्पीभवन आणि धरण क्षेत्रातील जमिनीत मुरणारे पाणी यामुळे हा साठादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा कमी आहे. या कारणामुळे यंदाच्या यात्रोत्सवासाठी पाणी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ३२ वर्षांपूर्वी पूर्व भागातील जि. प. सभापती रायभान काळे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दरवर्षी बोकटे येथील कालभैरव यात्रोत्सवासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. यानुसार गेली ३२ वर्षे नियमित यात्रोत्सवाला पाणी मिळत होते, तसेच यात्रोत्सवासाठी येणाऱ्या पाण्यामुळे कोळगंगा नदीपात्रावरील अनुक्र मे धामणगाव,अंदरसूल गवंडगाव, बोकटे, देवळाणे, दुगलगाव आणि नगर जिल्ह्यातील तिळवणी या गावांचा पाणी प्रश्न काही दिवस सुटत होता, परंतु यावर्षी प्रशासनाने पालखेड धरण समूहावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी यात्रेला पाणी न सोडण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे बोकटे यात्रोत्सवाला पाणी येणार नाही हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. यामुळे यात्रा काळात लाखो भाविकांच्या पिण्याच्या व वापरण्याचा पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)