देवळ्यासह नऊ गावात पाणीटंचाई
By admin | Published: February 25, 2016 10:46 PM2016-02-25T22:46:02+5:302016-02-25T23:19:54+5:30
पाण्यासाठी भटकंती : गिरणा नदीपात्र कोरडे; उपाययोजना करण्याची मागणी
देवळा : सामुदायिक पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर गिरणा नदीवर अवलंबून असून, गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे देवळ्यासह नऊ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोहोणेर येथील नऊ गाव पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर व येथील नगरपंचायतीची जलशुद्धीकरण योजनेची विहीर यातील साठा पाहता देवळा शहरासह नऊ गावांना पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. त्यावर उपाययोजना म्हणून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मात्र त्यांच्याही विहिरींनी तळ गाठला असल्याने शहराला डोण शिवारातील कालवण धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पिण्यासाठी ७ एमसीएफटी पाणी आरक्षित करून घेतले. योगायोगाने पुनंद व चणकापूरमधून रामेश्वरबरोबरच डोण शिवारातील कालवण धरणात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरासह नऊ गावांचा पाणीप्रश्न गिरणा नदीचे पुढील आवर्तन येईपर्यंत तरी सुटणार आहे. मात्र त्यासाठी लागणारा वीजपुरवठा आठवड्यातून तीन दिवस आठ तासच मिळणार आहे. मात्र सदरच्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसे झाले तरच पाणीप्रश्न सुटणार आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनी यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, प्रदीप अहेर, जितेंद्र अहेर, अतुल पवार, बाळासाहेब अहेर, किरण अहेर, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नंदन नवरे, उपअभियंता बोरसे, चव्हाण, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता घुमरे, तांत्रिक सल्लागार देवरे, कुरणे, कुंदन चव्हाण, संजय बांगर सहभागी झाले होते. (वार्ताहर)