पाणीटंचाई : आणखी काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:50 PM2018-11-22T22:50:19+5:302018-11-22T22:50:52+5:30
येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
यंदा अत्यल्प पावसाने शेतशिवार अल्प प्रमाणात भिजले; परंतु शेतकऱ्यांची तहान भागलीच नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसातही उष्मा अद्यापही कायम आहे. यंदा तालुक्यात पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. तालुक्यात टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची साडेसाती काही केल्या संपेना.
येवला परिसरात ५९२ मिमी पावसाची नोंद सरकार दरबारी दिसत असल्याने, येवला मंडळातील १८ गावे दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित राहिली तर पाटोदा, राजापूर, सावरगाव, अंदरसूल, नगरसूल या पाच मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे.
तालुक्यात जलयुक्त शिवाराचा कागदी डांगोरा, पाण्याचे शून्य नियोजन, असेल तेव्हा वारेमाप पाणीउपसा, पाणी अडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेले अपयश यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ अनेक ग्रामस्थांवर आली आहे.भूजल पातळी खालावलीपाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षलागवड केवळ कागदावरच राहिले आहे. याचे भान आता अधिकारी व ग्रामस्थांनाच यायला हवे. अन्यथा अनेक गावांना पाण्याअभावी स्थलांतर करण्याची वेळ दूर नाही. येवला तालुक्यात दहा मीटरच्या खाली भूजल पातळी गेली आहे. अनकाईसारख्या भागात १८ मीटरपर्यंत कोरडी विहीर जाते. यावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज येतो. दरवर्षी जानेवारी संपला की पुन्हा पाणीटंचाईचे वेध सुरू होतात, ही शोकांतिका आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. नियोजनशून्य पाण्याचा वापर हे एक प्रमुख कारण आहे. पंचायत समितीकडे टॅकरची मागणीरहाडी, धामणगाव, कासारखेडे, शिवाजीनगर, बाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, वाघाळे, खरवंडी, आडसुरेगाव, कोळमबुद्रुक, कोळम खुर्द, डोंगरगाव, कौटखेडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर. नगरसूल परिसरातील १२ वाड्या, राजापूर परिसरातील तीन वाड्या, भगतवस्ती (अनकाई ), बोराडे वस्ती (गोरखनगर), हनुमाननगर व (खिर्डीसाठे), अहिरेवस्ती (पिंपळखुटे खुर्द), सायगाव येथील महादेववाडी, कुळधरवस्ती (सायगाव), ममदापूर परिसरातील दोन वस्त्या, देवदरी (दाणेवस्ती), खरवंडी (बावाचे वस्ती), तळवडे परिसर चार वस्त्या, तालुक्यातील अन्य ठिकाणावरूनही पाणी टँकरची मागणी येवला पंचायत समितीकडे येत असून, आणखी गावे वाढण्याची शक्यता आहे.