पाणीटंचाई : ऐन उन्हाळ्यात रानोमाळ भटकंती
By admin | Published: May 23, 2015 11:47 PM2015-05-23T23:47:21+5:302015-05-23T23:47:51+5:30
बादलीभर पाण्यासाठी जीव टांगणीला
तळवाडे दिगर - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जंगलात राहणाऱ्या पिसोरे येथील आदिवासी लहान मुलींना गावातील तळ गाठलेल्या विहिरीत धोकादायक स्थितीत चढउतार करून बादलीभर पाण्यासाठी जीव टांगणीला लावावा लागत आहे, तर दुसरीकडे विहिरीत उतरू न शकणाऱ्या गावातील महिलांना ऐन उन्हाळ्यामध्ये थेंब-थेंब पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे.
गावातील पाणीपुरवठ्यासाठी सन १९८३मध्ये चार लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु गावात तशी पाणीपुरवठा यंत्रणा नाही की प्रत्यक्षात पाणीपुरवठा नाही. गावातच एक छोटेखानी विहिरी आहे. अवघ्या बारा ते पंधरा फूट खोली असलेल्या विहिरीमध्ये सध्या थोडेसेच परंतु अतिशय गलिच्छ पाणी आहे. परंतु टंचाई काळात तेही येथील ग्रामस्थांसाठी अमृता समान आहे. पाणी उपशाची थेट कुठलीही व्यवस्था नाही. पाण्यासाठी थेट विहिरीतच खाली उतरावे लागते. विहिरीच्या कडे - कपारीमध्ये हातांची बोट रुतवत विहिरीमध्ये चढता-उतरताना लहान-लहान मुलामुलींचा अक्षरश: जीव टांगणीला लागतो.
गावातील पाण्यासाठी दुसरे पर्यायी ठिकाण म्हणजे गावापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेला विनापाण्याचा धरणाचा पायथा. याठिकाणी गाळ मातीमध्ये महिलांनी ठिकठिकाणी खड्डे खोदून पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे. या खड्ड्यांमधून ताटली वाटीने पाणी उपसून - खरडून एक एक हंडाभर पाण्यासाठी एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागते. एक हंडा पाण्यासाठी दिवसभर महिलांना ‘नंबर’वर उभे रहावे लागते. रात्रीच्या वेळी धरणालगतच्या झाडींमध्ये मध्ये जंगली जनावरांच्या भीतीने ४० ते ५० पुरुष पाण्यासाठी रात्रभर जागे राहतात.
येथील स्त्री - पुरुष, तसेच मुलामुलींचा दिवस आणि रात्रीचा वेळ पाण्यासाठी जात आहे. अशा परिस्थितीत शंभर टक्के मोलमजुरी करणाऱ्या संपूर्ण गावातील आदिवासींना उदरनिर्वाहाची चिंता भेडसावू लागली आहे. पिण्याचेच पाणी जेथे महत्प्रयासाने मिळते तेथे आंघोळीसह इतर विधीक्रियांसाठी पाणी म्हणजे मौजच. आठ-आठ दिवस आंघोळीसह इतर गोष्टींसाठी पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.