पाण्याचे स्रोत कायमस्वरूपी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:26 AM2019-06-16T01:26:38+5:302019-06-16T01:27:44+5:30
नाशिक जिल्ह्यात पाण्याचे सार्वजनिक स्रोतांचे रासायनिक तपासणी करण्यात येऊन त्यात निम्म्याहून अधिक स्रोत जमिनीखालील पाणी आटल्यामुळे कायमस्वरूपी बंद झाल्याचे आढळून आले असून, ज्या स्रोतांमध्ये पाणी आढळले त्यांचे नमुने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. या पाण्याच्या स्रोतांचे शंभर टक्के जिओ टॅगिंग करण्यात आल्यामुळे भविष्यातही त्यातील पाण्याच्या स्रोताबाबत माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाण्याचे सार्वजनिक स्रोतांचे रासायनिक तपासणी करण्यात येऊन त्यात निम्म्याहून अधिक स्रोत जमिनीखालील पाणी आटल्यामुळे कायमस्वरूपी बंद झाल्याचे आढळून आले असून, ज्या स्रोतांमध्ये पाणी आढळले त्यांचे नमुने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. या पाण्याच्या स्रोतांचे शंभर टक्के जिओ टॅगिंग करण्यात आल्यामुळे भविष्यातही त्यातील पाण्याच्या स्रोताबाबत माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात पाणी स्रोतांची तपासणीचे अभियान १ मार्च ते १५ जून या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी नमुने शासनाने तयार केलेल्या जिओ फेन्सिंग मोबाइल अॅपद्वारे घेण्यात आले असून, जिल्ह्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात जिओ फेन्सिंग मोबाइल अॅपचा वापर करून एकूण ७३९३ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत प्रथमच स्रोतांचे १०० टक्के टॅगिंग करण्यात आल्याने टॅगिंग केलेल्या स्रोतापैकी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ४,५६९ स्रोतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात आले आहेत. उर्वरित २८२४ स्रोतांपैकी काही स्रोत विविध कारणांमुळे बंद, कायमस्वरूपी बंद, वापरात नसलेले, पाण्याअभावी कोरडे आढळून आले आहेत. सर्वेक्षणातून मिळालेल्या सर्व पाणी नमुन्यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सहा उपविभागीय व जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. राज्यात नाशिक, पालघर, नंदुरबार व धुळे याच जिल्ह्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, असेही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात या अभियानात तालुकास्तर ते ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करून आरोग्य, ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी अत्यंत चागल्या प्रकारे समन्वय साधून विहित वेळेत काम पूर्ण केले असून, राज्यात जिल्हा या कामात अव्वल असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.
असे होते जिओ फेन्सिंग
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी नमुने सॅटेलाइटद्वारे टॅग करण्यासाठी शासनाने नागपूर येथील एम. आर. सॅक या संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओ फेन्सिंग हे एक मोबाइल अॅप असून, सदर अॅप पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात. स्रोताच्या १० मीटरच्या परिघात गेल्यावर, अॅप सुरू करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करण्यात येऊन, फोटो घेऊन नमुना घेण्यात येतो. याद्वारे जिल्ह्यात किती स्रोतांची तपासणी झाली किती स्रोत शिल्लक राहिले याची माहिती मिळते.