प्राणी अडकल्याने जलवाहिनी बंद
By admin | Published: November 28, 2015 11:13 PM2015-11-28T23:13:17+5:302015-11-28T23:14:23+5:30
देवळा : प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी केले उपोषण
देवळा : जलकुंभाच्या जवळील नऊगाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमध्ये कुत्रा व बोकड जलकुंभातून वाहून आल्याने पाइपलाइन बंद पडल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी पाइपलाइन बंद का आहे? असे पाहिले असता त्यात कुजलेल्या अवस्थेतील प्राणी अडकल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तत्काळ जलकुंभ रिकामा करावा व पाइपलाइन कट करून अडकलेला प्राणी बाहेर काढावा असे कळविले असता अधिकाऱ्यांनी सुटीचे निमित्त करून कुठल्याही प्रकारचा कर्मचारी तब्बल दोन ते अडीच तास संबंधित स्थळी न पाठविल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी त्याचठिकाणी उपोषण सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमाने सदरची वार्ता संपूर्ण देवळा शहरात पसरल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव तत्काळ उपोषणस्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ कार्यवाही करण्यास भाग पाडले. सदर स्लॅबचे दुरुस्तीचे काम दुसऱ्याच दिवशी सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
सदरच्या वृत्तामुळे देवळा शहरातील अनेकांनी दोन चार दिवसांपूर्वी पिण्यासाठी भरून ठेवलेले पाणी फेकून दिले. खासगी कंपनीच्या पाण्याचे जारांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. याबाबत सदरचे वृत्त देवळा पोलिसांना कळताच त्यांनी संबंधित जागेचा पंचनामा केला. पाण्याचे नमुने घेतले व त्यात अधिकारी दोषी असेल तर त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.
सायंकाळी उशिरापर्यंत मालेगाव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश बोरसे, ल.पा.चे शाखा अभियंता डी. डी. चव्हाण यांनी जागेस भेट दिली.
यावेळी नितीन शेवळकर, अध्यक्ष विनोद देवरे, महेश सोनकुळे, संजय देवरे, दिनेश जाधव, दिनकर आहेर, भिला आहेर, गोरख निकम, पंडित पाठक आदिंसह पंडितराव मेधने, अतुल पवार, मुन्ना आहिरराव, विलास भामरे, बंडू आहेर आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.