बोलठाण येथील पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:09 PM2018-03-22T23:09:25+5:302018-03-22T23:09:25+5:30
नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना दोनशे लिटर पाण्यासाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत.
नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना दोनशे लिटर पाण्यासाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे खासगी पाणी विक्रीला चांगले दिवस आले आहेत. त्यातच थकीत पाणीपट्टीचा आकडा नऊ लाखापर्यंत गेला आहे.
पाणीपट्टीची वार्षिक मागणी दोन लाख ५० हजार रुपये आहे. न्यायालयात जाऊनही नळधारकांनी दाद न दिल्याने पाणीपट्टीची रक्कम वाढत गेली. बोलठाण गावात सुमारे ७५० नळधारक आहेत. यातील ग्रामपंचायत सदस्य वगळता इतरांनी बिले थकविली आहेत. सध्या बोलठाण गावातील एका कूपनलिकेचे पाणी आठ ते दहा दिवसांनी नळाला सोडले जाते. सहा कि.मी. अंतरावरील सामगाव धरणात विहीर खोदून बोलठाण गावाला नळाद्वारे पाणी सोडण्यात येते. सहा वर्षांपूर्वी ही योजना राबविण्यात आली आहे. परंतु सदर धरणात आता पाणी नसल्याने योजना कुचकामी झाली आहे. आता गावातील खासगी बोअरवेल अधिग्रहित करून पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे.