कॅम्पला दोन वेळ पाणीपुरवठा
By Admin | Published: September 2, 2016 12:37 AM2016-09-02T00:37:51+5:302016-09-02T00:40:24+5:30
छावणी परिषदेचा निर्णय : भुयारीमार्ग आणि व्यापारी संकुल योजनेलाही मंजुरी
देवळालीकॅम्प : देवळालीकॅम्पमध्ये तीन नवीन व्यापारी संकुल, भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजुरी देत दोन वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय छावणी प्रशासन बोर्ड बैठकीत घेण्यात आला.
छावणी परिषद नगरसेवक व प्रशासन बोर्डाची बैठक पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत पाणीप्रश्नावर चर्चा होऊन यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने व धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने छावणी परिषद हद्दीत दोनवेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच मागासवर्गीय परिसर व आर्थिक दुर्बलांना स्वतंत्र नळजोडणी देत त्याकरिता ५०० रुपये अनामत रक्कम घेऊन ४० रुपये प्रति महिना पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच छावणी रुग्णालयाचे नूतनीकरण, छावणी परिषद मुख्य कार्यालय इमारत व छावणी मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थान नूतन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. तसेच छावणी परिषद हद्दीत १५० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेतील ६० कोटी रुपयाच्या पहिल्या टप्यातील कामाची निविदा काढण्यासदेखील मंजुरी देण्यात आली. तसेच सर्व प्रमुख रस्त्यांवरील पदपथची रुंदी कमी करून रस्त्याचे ंरुंदीकरण व डांबरीकरण कामालादेखील मंजुरी देण्यात आली यावेळी बैठकीला नगरसेवक दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, कावेरी कासार, मीना करंजकर, लष्कर नियुक्त सदस्य ब्रिगेडियर एस. एम. सुदुंबरेकर, ब्रिगेडियर गेरिसन इंजिनियर कर्नल चंद्रशेखर, मेजर पीयूष जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार उपस्थित होते. (वार्ताहर)