पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:23+5:302021-07-11T04:11:23+5:30

पांगरी : ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती पांगरी : येथे ग्रामपंचायतीतर्फे होणाऱ्या नळ पाणीपुरवठा सुमारे बारा ते पंधरा दिवसांपासून ...

Water supply cut off for fortnight | पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

Next

पांगरी : ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

पांगरी : येथे ग्रामपंचायतीतर्फे होणाऱ्या नळ पाणीपुरवठा सुमारे बारा ते पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, त्वरित मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने पाणी बेचव तसेच क्षारयुक्त झाल्याने, मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी चालू होणे गरजेचे आहे.

मागील दोन वर्षांपासून येथे समाधानकारक पाऊस पडल्याने येथील जाम नदीला पाणी आले, त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जाम नदीपात्रातील विहिरीला मुबलक पाणी आले. परंतु, जून महिना संपला तरी पाऊस झाला नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाण्याची पातळी कमी होऊन पाणी क्षारयुक्त व बेचव लागत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून शुद्ध पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरळीत करून पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य रवी पगार, शिवसेना गटप्रमुख प्रकाश पांगरकर, स्वाभिमानी तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, सुभाष पांगारकर, युनूस कादरी, सुरेखा निरगुडे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

------------------

योजनेची पाईपलाईन उद्‌ध्वस्त

दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने नदीला पाणी आल्याने मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची गरज भासली नाही, त्यामुळे या योजनेचे पाणी घेणे बंद होते. परंतु, पावसाळा सुरू झाला असला तरी मृगपाठोपाठ सर्वच नक्षत्र कोरडे जात असल्याने विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने पाणी बेचव व क्षारयुक्त झाले आहे. त्यामुळे योजनेच्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, सिन्नर-शिर्डी रस्त्याचे काम सुरू असल्याने देवपूर फाटा ते पांगरीपर्यंत असलेली योजनेची पाईपलाईन पूर्णत: उद्‌ध्वस्त झाली असून नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, परंतु कासवगतीने काम चालू आहे.

------------------

नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी कमी झाली आहे. तसेच सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कामामुळे मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन तुटली आहे. तिचे काम त्वरित करण्याची सूचना देण्यात आली असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.

- पी. आर. बोरसे, ग्रामविकास अधिकारी

Web Title: Water supply cut off for fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.