वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:46 PM2018-01-24T23:46:08+5:302018-01-25T00:04:37+5:30
ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २००७पासून सुरू करण्यात आली होती
ठाणगाव : ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २००७पासून सुरू करण्यात आली होती. उंबरदरी धरणातून ही पाणीपुरवठा योजना करण्यात आली असून, वीजबिल थकल्याने योजना ठप्प झाली आहे. वीज वितरण कंपनीचे वीस लाखांच्या पुढे बिल थकले असून, वीज कंपनीच्या वतीने जोडणी तोडण्यात आली आहे. उंबरदरी धरणात मुबलक पाणी शिल्लक असताना केवळ वीजजोडणी कापल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात उंबरदरी धरणातून रब्बी पिकासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे महिलावर्गाची कपडे धुण्यासाठी म्हाळुंगी नदीवर गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाणगाव ग्रामपंचायत त्याच्या हिश्शाचे पैसे भरण्यास तयार असून, बाकीच्या ग्रामपंचायतीने आपापल्या हिश्श्याचे पैसे भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी पट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी डी.एस. भोसले यांनी केले आहे. वीज वितरण कंपनीचे ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे तेहवीस लाख वीस हजार रुपये एवढे बिल थकलेले असून, यामध्ये ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश आहे.