दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Published: June 1, 2015 01:11 AM2015-06-01T01:11:47+5:302015-06-01T01:12:10+5:30
दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
सिडको : येथील प्रभाग क्रमांक ४१, ४२ व ४३ मध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, यामुळे महिला वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नगरसेवकांनाही नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देणे अवघड होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सिडको भागातील पाणीपुरवठा न होणे, पाणीपुरवठा विस्कळीत होणे अशा घटना कायमच घडत असतात. अर्थात यास मनपाचे अधिकारी व व्हॉल्व्हमनच जबाबदार असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जुने सिडको परिसर, हनुमान चौक, राणाप्रताप चौक यांसह प्रभाग क्रमांक ४१, ४२ व ४३ मधील पाणीपुरवठा संपूर्ण विस्कळीत झाल्याने नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सिडकोतील काही भागात पाणीपुरवठा होतो, तर काही भागात होत नसल्याने यास अधिकाऱ्यांचाच नियोजनशून्य कारभार उघडकीस येत आहे. पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हे नगरसेवकांना कळवितात. यानंतर नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा कसा घडेल यासाठी पाठपुरावा करतात. गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने प्रभागाच्या नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले व अॅड. अरविंद शेळके हे आयुक्तांची भेट घेणार आहेत. (वार्ताहर)