पाटोळ्यात सिमेंटच्या भांड्यातून पशु-पक्षांसाठी पाण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:15 PM2019-05-20T18:15:55+5:302019-05-20T18:16:32+5:30
सिन्नर : तालुक्यात सर्वत्र प्रचंड दुष्काळाचे वातावरण असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली असून पशू-पक्षी व जनावरेदेखील पाण्याच्या शोधात रानोमाळ फिरताना दिसत आहेत. जनावरांसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने त्रस्त झालेल्या पशुपालकांसाठी पाटोळे येथील सरपंच मेघराज आव्हाड यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
सरपंच मेघराज आव्हाड यांनी सिमेंटची १५ भांडी गाव परिसरासह व जंगलात ठेवून पाळीवच नव्हे तर पशू-पक्ष्यांबरोबरच जंगली श्वापदांनाही पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या पाटोळेत ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची वानवा असतानाच पशू-पक्ष्यांना पाणी कोठून मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाटोळे गावात गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कुत्री आदी १ हजाराहून अधिक पाळीव जनावरे आहेत. सरकारकडून अजूनही जनावरांसाठी पाणी उपलब्ध झालेले नाही. अशा स्थितीत बाजाराचा रस्ता दाखविण्यास पशुपालकांनी सुरूवात केली होती. त्यामुळे सरपंच आव्हाड यांनी स्वखर्चातून पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्राणी जगले पाहिजेत, नैसर्गिक अन्नसाखळी टिकली पाहिजे या विचारातून वन्यजीवांना पाण्याची सुविधा उपलब्ध केल्याचे सरपंच आव्हाड यांनी सांगितले. या सुविधेमुळे चिमणी, कबुतर, कावळा आदी पक्ष्यांनाही पाणी उपलब्ध झाले आहे.