पाणीपुरवठ्याचे मोजमाप

By admin | Published: January 2, 2016 11:37 PM2016-01-02T23:37:11+5:302016-01-02T23:42:12+5:30

सोशल आॅडिट : वितरण व्यवस्थेतील असमतोल उघड, जनतेचेही प्रबोधन

Water supply measurement | पाणीपुरवठ्याचे मोजमाप

पाणीपुरवठ्याचे मोजमाप

Next

नाशिक : महापालिकेने पाणीपुरवठ्यातील वितरण व्यवस्थेच्या सोशल आॅडिटला शनिवारी पहाटेपासून सुरुवात केली. शहरातील ९४ जलकुंभांसह सहा जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणीपुरवठ्याचे मोजमाप करताना वितरण व्यवस्थेतील असमतोलाचे दर्शन तर घडलेच शिवाय सिडको परिसरात पाण्याचा अपव्ययही होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन पाणीबचतीसंबंधी जनतेच्याही प्रबोधनाची भूमिका निभावली. सदर आॅडिटच्या माध्यमातून निघणाऱ्या निष्कर्षातून समन्यायी पद्धतीने पाणीवाटपासंबंधी नियोजन केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा आणि सुरू असलेली पाणीकपात याचा मेळ घालत जुलै २०१६ अखेरपर्यंत पाणीनियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे चोवीस तासांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारी पहाटे ५ वाजता शहरातील सर्व ९४ जलकुंभ आणि ६ जलशुद्धीकरण केंद्रांवर त्याची सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे २० अभियंते आणि संदीप फाउंडेशन, शासकीय तंत्रनिकेतन आणि मविप्र संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे १८५ विद्यार्थ्यांनी जलकुंभामधील पाणीपुरवठ्याचे मोजमाप केले. त्यात प्रामुख्याने, गंगापूर व दारणा धरणातून २४ तासांत किती पाण्याची उचल होते, तेथून सहा जलशुद्धीकरण केंद्रांवर किती पाणी पोहोचते आणि किती पाणी पुढे वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जलकुंभाद्वारे पाठविले जाते, जलकुंभ किती वेळात भरला जातो आणि किती वेळात खाली होतो, जलकुंभापासून घरोघरी किती मिनिटांत पाणी जाऊन पोहोचते आणि किती प्रमाणात पाणी मिळते, या साऱ्या प्रश्नांची पडताळणी करण्यात आली. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सहा जलकुंभ आहेत. तेथील पाणीपुरवठ्याचे मोजमाप स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर सिडको, सातपूर परिसरातील जलकुंभांद्वारे होणाऱ्या वितरण व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. जलकुंभाला जो भाग जोडण्यात आला आहे, तेथील परिसरातील घरोघरी जाऊन पाणी वितरणाची माहिती संकलित करण्यात आली. पाण्याच्या मीटर्सची तपासणी करण्याबरोबरच जेथे मीटर नाहीत त्याठिकाणी एक बादली किती वेळात भरते, याचे मोजमाप करण्यात येऊन नोंदी घेण्यात आल्या. याचवेळी सिडकोतील पवननगर, सावतानगर परिसरात रस्त्यावरून पाणी वाहून जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी पाणीबचतीसंबंधी जनतेचे प्रबोधनही केले.
याचदरम्यान, आयुक्तांनीही काही परिसरात प्रत्यक्ष भेटी घेऊन पाणीवितरणातील व्यवस्थेची पाहणी केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, शिवाजी चव्हाणके यांनीही ज्या भागातून पाणीटंचाईच्या तक्रारी होत्या तेथे प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली. सदर सोशल आॅडिट रविवार, दि. ३ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या आॅडिटदरम्यान परिसरातील नागरिकांकडून पाणीपुरवठ्यासंबंधी सूचना व तक्रारींबाबत विहित नमुन्यातील फॉर्मही भरून घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply measurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.